दर्यापूर बस स्थानकात प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:14 AM2021-02-11T04:14:03+5:302021-02-11T04:14:03+5:30
फिल्टरला नाही पाणी, नळांकडे धावणाऱ्या प्रवाशांची निराशा दर्यापूर : येथील बस स्थानकात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत ...
फिल्टरला नाही पाणी, नळांकडे धावणाऱ्या प्रवाशांची निराशा
दर्यापूर : येथील बस स्थानकात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, याकडे आगार व्यवस्थापकांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
दर्यापूर बस स्थानकात दिवसभर प्रवाशांची रेलचेल असते. अमरावती, अकोला, अंजनगाव, अकोट तसेच मूर्तिजापूर मार्गे प्रवाशांना याच बस स्थानकातून जावे लागते. आता दुपारी चांगलेच ऊन पडत असल्याने प्रवासी आपली तहान भागविण्याकरिता बस स्थानकावर पिण्याचे पाणी शोधतात. काही बसमधील प्रवासी स्थानकावर बस थांबताच नळावर आपली बॉटल भरण्याकरिता जातात. परंतु, त्या ठिकाणी नळाला पाणीच नसल्याने त्यांची निराशा होते.
दर्यापूर बस स्थानकावर वाॅटर फिल्टर अनेक दिवसांपासून बंद आहे. येथे खेड्यापाड्यांमधून अनेक वृद्ध प्रवासी येत असतात तसेच आता शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा पिण्याचे पाणी मिळत नाही. याकडे आगार व्यवस्थापकांनी लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
कोट :-
अनेक दिवसांपासून बस स्थानकावरील नळ बंद असल्याने तसेच वॉटर फिल्टरमध्येसुद्धा पिण्याचे पाणी प्यायला मिळत नाही. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते.
- प्रभाकर डोंगरदिवे, लेहेगाव (प्रवासी विद्यार्थी)
कोट :-
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे नळावाटे येथील वॉटर फिल्टरजवळ लावला आहे. नळ आले की, त्यामध्ये पाणी येते. पाणी मिळत नसल्याची अजूनपर्यंत तक्रार आली नाही.
- जयकुमार इंगोले, आगार व्यवस्थापक