शहरातील हवेच्या गुणवत्तेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:11 AM2021-07-26T04:11:45+5:302021-07-26T04:11:45+5:30
अमरावती : कोरोनाकाळातील लॉकडाऊन, दिवसाची संचारबंदी याशिवाय पर्यावरणासंदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे शहरतील हवेच्या गुणवत्तेत गतवर्षीच्या तुलनेत सुधारणा झालेली आहे. ...
अमरावती : कोरोनाकाळातील लॉकडाऊन, दिवसाची संचारबंदी याशिवाय पर्यावरणासंदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे शहरतील हवेच्या गुणवत्तेत गतवर्षीच्या तुलनेत सुधारणा झालेली आहे. महापालिकेच्या पर्यावरण संवर्धन अधिकाऱ्यांनी हा अहवाल मंगळवारी सादर केला.
महापालिकेचा येथील शिवाजी सायन्स कॉलेजसोबत सामंजस्य करार झालेला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाद्वारा तपासणी अहवालातही हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, ध्वनी प्रदूषणात सुधार नसल्याने सभागृहाने चिंतादेखील व्यक्त केलेली आहे. हवेच्या गुणवत्तेबाबत प्राप्त माहितीनुसार, रहिवासी क्षेत्रात एनओएक्स व एसओटूचे प्रमाण अनुक्रमे १२.४५ व १०.९८ आहे. हे प्रदूषण पातळी ८० पेक्षा कमी आहे. याशिवाय आरएसपीएमचे प्रमाण सरासरी ४८.६१ म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी आहे. सन २०१९ - २९०मध्ये हे प्रमाण ६९.६४ एवढे होते.
औद्योगिक एनओएक्स व एसओटूचे प्रमाण अनुक्रमे १३.६९ व १२.२८ एवढे आहे. आरएसपीएमचे प्रमाण ५३.४९पेक्षा कमी आढळले आहे. गतवर्षी हे प्रमाण ८५.८३ होते. त्यामुळे यंदा घट झाल्याचे दिसून येते. शिवाय व्यापारी क्षेत्रात एनओएक्स व एसओटूचे प्रमाण अनुक्रमे १५.३ व १३.८० आढळले. हे अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी आहे. आरएसपीएमचे प्रमाणही अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी ५६.८१ आढळून आले आहे. गतवर्षी हे प्रमाण ८३.३० एवढे आढळून आले होते.
बॉक्स
पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे आरएसपीएम वाढणार
गतवर्षीच्या तुलनेत रहिवासी, औद्योगिक व व्यापारी क्षेत्रातील एनओएक्स, एसओटूच्या प्रमाणात घट आलेली आहे. मात्र, यात अधिक प्रयत्नांची गरज आहे. याशिवाय शहरात पायाभूत सुविधांच्या कामामुळे आरएसपीएमच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांचा विचार करता या प्रमाणात सातत्याने कमी येत आहे.
बॉक्स
वाढते ध्वनीप्रदूषण चिंतेचा विषय
दिवसेंदिवस वाढते नागरीकरण, वाहनांची संख्यावाढ, डीजे संस्कृतीचे वाढते प्रमाण यामुळे शहरातील ध्वनीप्रदूषणात झालेली वाढ चिंताजनक आहे. यामुळे मानवी आरोग्यावर शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होतात. यासाठी शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालये या सभोवतीच्या १०० मीटरच्या परिसरात शांतता क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे.