सर्दी, खोकला, व्हायरल डायरियाच्या आजारात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:29 PM2019-01-23T22:29:56+5:302019-01-23T22:30:23+5:30
वातावरणातील अचानक बदलामुळे तसेच थंडीतील चढउतार आजाराला निमंत्रण देत आहे. सर्दी, खोकला, अस्थमा व पोटाच्या विकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये व्हायरल डायरिया व व्हायरल ब्रोन्कायटीस सारख्या आजाराने डोके वर काढले आहे. त्याच कारणाने रोज शेकडो रुग्ण शासकीय, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी धाव घेत आहेत.
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वातावरणातील अचानक बदलामुळे तसेच थंडीतील चढउतार आजाराला निमंत्रण देत आहे. सर्दी, खोकला, अस्थमा व पोटाच्या विकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये व्हायरल डायरिया व व्हायरल ब्रोन्कायटीस सारख्या आजाराने डोके वर काढले आहे. त्याच कारणाने रोज शेकडो रुग्ण शासकीय, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी धाव घेत आहेत.
येथील इर्विन रुग्णालयात रोज १०० ते १५० रुग्णांची तपासणी होत आहे. यातील अनेक रुग्ण उपचारासाठी दाखलसुद्धा होत आहेत. प्रत्येक खासगी दवाखान्यांमध्ये १५ ते २० रुग्ण विविध प्रकारच्या आजारावर उपचार घेण्यासाठी दाखल होत असल्याची माहिती, विविध डॉक्टरांनी दिली. या दिवसांत हवेतून विविध संसर्ग होऊन विविध आजार नागरिकांना जडत आहेत. तसेच ग्रामीण भागातील काही गावांमध्ये लहान मुलांमध्ये गालफुगीच्या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत.
अशी घ्यावी काळजी
लहान मुलांमध्ये या दिवसांत विविध आजाराचे प्रमाण वाढत असते. कुठल्याही आजारांची लक्ष्णे आढळल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी मुलांना नेले पाहिजे. तसेच लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्या कारणाने न्यूमोनिया होण्याची शक्यताही अधिक असते. त्या कारणाने निमोनिया व स्वाईन फ्लू प्रतिबंधक उपचार करून घेतले पाहिजे, असे मत बालरोगतज्ज्ञ धीरज सवाई यांनी व्यक्त केले.
लहान मुलांमध्ये व्हायरल डायरिया
वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे व गारवा व थंडी वाढल्याने लहान मुलांमध्ये व्हायरल डायरिया व व्हायरल ब्रोन्कायटीस हे आजार प्रामुख्याने होत आहे. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्या कारणाने विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार बळावतात. पोेटाचे विकार वाढतात.
संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी हे करा
सर्दी, ताप व खोकला व इतर आजारांपासून बचावासाठी या दिवसांत उबदार कपडे परिधान करावे, गरम पाण्यात गुळण्या करणे, थंड व फ्रिजमधील पाणी किंवा फ्रिजमधील पदार्थ न खाणे, तसेच लहान मुलांनी थंडीच्या वेळेत बाहेर न पडणे आदी प्रकारची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, व बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे तसेच स्वच्छ कपडे वापरावे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
या दिवसांत व्हायरल डायरियासारखे आजाराचे रुग्ण तपासणी करण्याकरिता येतात. लहान मुलांची थंडीच्या दिवसांत रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. अशावेळी न्यूमोनिया व स्वाईन फ्लूचे निदान करुन घेतले पाहिजे.
- धीरज सवाई,
बालरोगतज्ज्ञ अमरावती
या दिवसाची नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, अस्थमा व इतर आजाराचे रुग्ण तपासणी करीता येत आहेत.
- विलास पाटील,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक