कोविड चाचण्या वाढवा, पालकमंत्र्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 05:00 AM2020-12-23T05:00:00+5:302020-12-23T05:00:57+5:30
नववर्षात सारेच भयमुक्त होऊ, असा विश्वास निर्माण करण्याइतपत कोरोनावर नियंत्रण आले असतानाच कोरानाचे म्युटेटेड रूप जगापुढे आल्यामुळे काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. कोरोनाचे उत्परिवर्तित रूप मूळ कोरोना विषाणूपेक्षाही ७० टक्के अधिक घातक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हे जीवघेणे संकट तूर्त परदेशात असले तरी वुहानप्रमाणे ते आपल्या उंबरठ्यावर उभे आहे. त्यामुळे आता पूर्वीपेक्षाही अधिक दक्षता घेणे गरजेचे असल्याचे ना. ठाकूर यांनी म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ब्रिटेन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचे उत्परिवर्तित रूप आढळून आले. नव्या रूपातील हा विषाणू अत्यंत धोकादायक आहे; तथापि घाबरून न जाता निर्धारपूर्वक दक्षता पाळण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे. मास्क काटेकोरपणे वापरा. कोराना बचावाच्या इतर दक्षतांची अंमलबजावणी करा, असा संदेश नागरिकांना देतानाच प्रशासनालाही कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश त्यांनी मंगळवारी दिले.
नववर्षात सारेच भयमुक्त होऊ, असा विश्वास निर्माण करण्याइतपत कोरोनावर नियंत्रण आले असतानाच कोरानाचे म्युटेटेड रूप जगापुढे आल्यामुळे काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. कोरोनाचे उत्परिवर्तित रूप मूळ कोरोना विषाणूपेक्षाही ७० टक्के अधिक घातक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हे जीवघेणे संकट तूर्त परदेशात असले तरी वुहानप्रमाणे ते आपल्या उंबरठ्यावर उभे आहे. त्यामुळे आता पूर्वीपेक्षाही अधिक दक्षता घेणे गरजेचे असल्याचे ना. ठाकूर यांनी म्हटले आहे.
ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधांचा पुरेसा साठा ठेवा
कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी परिश्रम घेतले. आता नव्या रूपातील विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. पूर्वीपेक्षाही अधिक श्रम घ्यावे लागतील. आरोग्य यंत्रणेने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा. अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो, त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
कॉमार्बिड रुग्णांशी संपर्क करा
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सहव्याधी (कॉमार्बिड) असलेल्या लोकांची माहिती आरोग्य विभागाकडे आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा सहव्याधी रुग्णांशी संपर्क करावा. त्यांच्याशी संवाद साधून त्यांची आरोग्यविषयक काळजी घेतानाच त्यांना सतर्क करण्याचे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले. नागरिकांनीही मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, अनावश्यक गर्दी टाळणे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे कळकळीचे आवाहन ना. ठाकूर यांनी केले.
कोरोनाचे नवे रूप धोकादायक आहे. परंतु, नागरिकांनी बचावासाठी उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास कुठल्याही कोरोनाला हरविणे शक्य आहे. महाराष्ट्र शासन सर्व पातळ्यांवर संवेदनशीलपणे जबाबदारी पार पाडत आहेच. पूर्वी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या यंत्रणांना त्याहीपेक्षा सतर्क आणि कार्यतत्पर राहण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. नागरिकांनीही मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे आवर्जून पालन करावे. - यशोमती ठाकूर, पालकमंत्री