शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गुन्हे दोष सिद्धीच्या प्रमाणात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:10 AM2021-07-04T04:10:08+5:302021-07-04T04:10:08+5:30
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हे दोष सिध्दीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या ...
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हे दोष सिध्दीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे दोष सिध्दीचे प्रमाण वाढले आहे. ही वाढ राज्य दोष सिध्दीच्या प्रमाणपेक्षा अधिक असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली.
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात जून २०२० या महिन्यात भारतीय दंड विधान संहिता व विशेष कायदा या गुन्ह्याचे दोष सिध्दीचे प्रमाण अत्यल्प होते. त्याचप्रमाणे जानेवारी २०२० ते जून २०२० दरम्यान भारतीय दंड विधान संहिता ५० टक्के व विशेष कायदा ८ टक्के असे अल्प प्रमाण दोष सिध्दीचे होते. हे प्रमाण लक्षात घेता पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन पोलीस अधिकारी व अमंलदारांना तपासाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तपास अधिकाऱ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. उत्कृष्ट अधिकारी व अंमलदारांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना प्रशस्तीपत्र व बक्षिसे देऊन गौरविले. त्यामुळेच जून २०२१ मध्ये भारतीय दंड विधान संहिता ९३.३३ टक्के आणि विशेष कायद्याचे दोष सिध्दीचे प्रमाण १०० टक्के झाले. जानेवारी २०२१ ते जून २०२१ दरम्यान भारतीय दंड विधान संहितेचे ७५ व विशेष कायद्याचे २२ टक्के याप्रमाणे दोष सिध्दीच्या प्रमाणात भरीव वाढ झाली आहे.