शिक्षक बँकेच्या मयत सभासद कल्याण निधीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:14 AM2021-03-25T04:14:39+5:302021-03-25T04:14:39+5:30
अमरावती : शिक्षक बँकेच्या मृत सभासद कल्याण निधीत १० लाखांची वाढ करण्यासोबतच मासिक ठेवीतही वाढीचा निर्णय सर्वसाधारण सभेत ...
अमरावती : शिक्षक बँकेच्या मृत सभासद कल्याण निधीत १० लाखांची वाढ करण्यासोबतच मासिक ठेवीतही वाढीचा निर्णय सर्वसाधारण सभेत सर्वानुमते घेण्यात आला.
दी अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी बँकेच्या मुख्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच ऑनलाइन पद्धतीने पार पडली. सभेत अनेक विषयांवर चर्चा करून काही महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले. बँकेच्या मृत सभासद कल्याण निधीत तब्बल १० लाखांची वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे आता एखाद्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला २० लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी सभासदांच्या वेतनातून आता दर महिन्याला २५० रुपयांऐवजी ५०० रुपये कपात केली जाणार आहे. विशेष म्हणजे, याआधी मृत सभासदाच्या अंत्यविधीच्या दिवशी बँकेकडून २५ हजार रुपये देण्यात येत होते. आता त्याच दिवशी १ लाखरुपये देण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला. सभासदांच्या मासिक ठेवीत ५०० रुपयांवरून १ हजार रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. अनेक सभासदांनी यावेळी व्याजदर कमी करण्याची मागणी केली. त्यावर अध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी कोरोनामुळे बँकेत निर्माण झालेल्या स्थितीची माहिती त्यांच्यापुढे मांडली. भविष्यात परिस्थिती पाहून व्याजदर कमी करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सभेला शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष छोटूसिंग सोमवंशी, संजय भेले, सुनील केने, किरण पाटील, प्रफुल्ल शेंडे, विजय पुसलेकर, प्रमोद ठाकरे, मनोज ओळंबे, राजेन्द्र गावंडे, उमेश गोदे, नीळकंठ यावले, अजयानंद पवार, अ.राजीक हुसेन, शैलेश चौकसे, सुदाम राठोड, ज्ञानेश्वर घाटे, मधुकर चव्हाण, रवीन्द्र निंघोट, अर्चना सावरकर, सुनीता लहाने, सरव्यवस्थापक राजेश देशमुख, कृणाल ठाकरे आदी उपस्थित होते. ऑनलाईन सभेत विविध विषयांवर सभासदांनी प्रश्न विचारले. त्यावर अध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी उत्तरे दिली. जिल्ह्यातील सुनील गोटे, गौरव काळे, डी.आर. जामनिक,सत्येंद्र अभ्यंकर, अशोक पारडे, विलास बाबरे, गोपाल पवार, सूरज मंडेसह अन्य सदस्यांनी प्रश्न मांडलेत.