मतदार यादीत स्त्री-पुरुष गुणोत्तरात वाढ; अंतिम मतदार यादीत प्रमाण ९४० वरून ९४३ वर पोहोचले
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: January 29, 2024 10:00 PM2024-01-29T22:00:22+5:302024-01-29T22:00:45+5:30
ऑक्टोबर २०२३ मध्ये जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.
अमरावती : ऑक्टोबर २०२३ मध्ये जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर यादीत ५४ हजार मतदारांची नव्याने नोंदणी झालेली आहे व मृत, स्थलांतरित, दुबार आदी प्रकारांत ४७ हजार मतदार यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे अंतिम मतदार यादीत ६६७२ मतदारांची वाढ झाली. यामध्ये ११४७ पुरुष तर ५५११ स्त्री मतदार आहेत. त्यामुळे मतदार यादीत स्त्री-पुरुष गुणोत्तराचे प्रमाण ९४० वरून ९४३ वर पोहोचल्याचे दिसून येते.
निवडणूक आयोगाद्वारा मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ दरम्यान आटोपलेला आहे. अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी झाल्यानंतर वाढीव मतदारांत महिला मतदारांचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक विभागाद्वारा सातत्याने मतदार वाढीवर जोर दिल्याने हे शक्य झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाद्वारा कामांची लगबग सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिला महत्त्वाचा टप्पा मतदार यादीचा असतो तो आता आटोपला असल्याने जिल्हा निवडणूक विभागाद्वारा निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकारी, नोडल अधिकारी यांचे प्रशिक्षण, सर्व सुविधांयुक्त मतदान केंद्र या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला वेग आलेला आहे. याबाबत तीनवेळा प्रशिक्षण सत्र आटोपले आहेत व मतदान केंद्रांत आवश्यक त्या सुविधा तयार करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहेत.
वाढीव मतदारांत ११४७ पुरुष तर ५५११ महिला
अंतिम मतदार यादीत ६६६२ मतदारांची वाढ झालेली आहे. यामध्ये ११४७ पुरुष, ५५११ महिला व चार तृतीयपंथीय मतदारांची वाढ झालेली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या व ‘स्वीप’द्वारे महिला मतदारांमध्ये सातत्याने जागृती करण्यात आलेली आहे. यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ९४० वरून ९४३ एवढे झाले आहे.
महाविद्यालयांमध्ये शिबिर, सण-उत्सवात विविध उपक्रम, स्पर्धा याशिवाय सातत्याने जनजागृती केल्याने मतदार यादीत महिला मतदारांची मोठ्या प्रकारे नोंद झाली व वाढीव मतदारांत स्त्री-पुरुष गुणोत्तराचे प्रमाण वाढले आहे.
-शिवाजीराव शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी