सुपरस्पेशालिटीत खाटांची संख्या वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:14 AM2021-04-23T04:14:12+5:302021-04-23T04:14:12+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. विभागीय संदर्भ सेवा ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ४५ अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. रुग्णसेवा पुरविताना सुरक्षिततेच्या इतर बाबींचीही दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी दिले.
नाशिक येथील रुग्णालयात प्राणवायूच्या टाकीची गळती होऊन त्या दुर्घटनेत २४ कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमावावा लागला. या दुर्घटनेत मृत पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांप्रती पालकमंत्र्यांनी संवेदना व दु:ख व्यक्त केले. याच अनुषंगाने त्यांनी विभागीय संदर्भ रुग्णालयातील जिल्हा कोविड रुग्णालय, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्था व ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख आणि अनेक वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हा कोविड रुग्णालय व पीडीएमसी येथील ऑक्सिजन पुरविणारी यंत्रणा सुस्थितीत असली तरी दक्ष राहणे व वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन पुरविणाऱ्या यंत्रांची नियमित पाहणी व वेळोवेळी देखभाल करण्यात यावी. तांत्रिकदृष्ट्या थोडीही त्रुटी असता कामा नये. तसे निदर्शनास आले तर ती तत्काळ दूर करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले.
बॉक्स
शंभर टक्के खबरदारी आवश्यक
सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणेची वेळोवेळी तपासणी करणारी कायमस्वरूपी यंत्रणा सुसज्ज करावी. रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टर व स्टॉफशीही त्यांनी संवाद साधला. सध्याचा काळ कठीण आहे. आपली स्वत:ची सुरक्षितता जोपासून आपण सर्वांनी मिळून या कठीण काळावर मात करायची आहे. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा दिलासा त्यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.
बॉक्स
रुग्णांच्या आप्तांशी संवाद
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांशी संवाद साधून ना. ठाकूर यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची भेट होऊ शकत नाही. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीबाबत माहिती नातेवाईकांपर्यंत पोहोचू शकत नाही. अशावेळी रुग्णांच्या आप्तांना एक स्वतंत्र दूरध्वनी क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.