डासांच्या संख्येत वाढ, मात्र बहुतांश प्रभावहीन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:32 AM2019-04-26T01:32:54+5:302019-04-26T01:33:20+5:30
शहरात डासांची संख्या तर वाढत आहे, मात्र ते इन्फेक्टिव्ह नसल्याने हिवतापाच्या रुग्णांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत नगण्य असल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवार, २५ एप्रिल रोजी जागतिक हिवतापदिनी जिल्हा आरोग्य कार्यालयाद्वारा रॅलीद्वारे याबाबत जागृती करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात डासांची संख्या तर वाढत आहे, मात्र ते इन्फेक्टिव्ह नसल्याने हिवतापाच्या रुग्णांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत नगण्य असल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवार, २५ एप्रिल रोजी जागतिक हिवतापदिनी जिल्हा आरोग्य कार्यालयाद्वारा रॅलीद्वारे याबाबत जागृती करण्यात आली.
हिवताप म्हणजेच मलेरिया होय. हा आजार 'अॅनाफिलिस' नावाच्या मादी डासापासून होतो. हे मादी डास रक्त शोषण करताना हिवतापाच्या रुग्णाचे रक्त शोषल्यानंतर इतर सुदृढ व्यक्तींना डंक मारताना प्रथम तिची लाळ डंकाद्वारा दुसऱ्याच्या शरीरात सोडते. त्यानंतर रक्त शोषण करते. या प्रक्रियेतून सदर व्यक्तीच्या शरीरात हिवतापाचे जंतू प्रवेश करतात. त्याची शरीरात वाढ झाल्यानंतर आठ दिवसांत अतिथंडी वाजून शरीर थंड पडते हे मलेरिया आजाराचे प्रथम लक्षण आहे. त्यानंतर आठ दिवसांनी मलेरिया आजार प्रकर्षाने जाणवतो. यावर वेळीच उपचार न झाल्यास जंतांचे प्रमाण वाढून मेंदूत ताप शिरल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. मागील काही दशकांत मलेरियाचा प्रसार वेगाने झाल्यामुळे ही मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे शासनातर्फे हिवतापाचे स्वतंत्र आरोग्य विभाग उदयास आले. प्रत्येक जिल्ह्यात ठरावीक ऋतूमध्ये हिवतापाची तपासणी केली जाते. डास उत्पत्ती थांबविली जाते. त्याचप्रमाणे जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ दरम्यान ३७०० नमुने तपासले गेले. त्यात १३६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यातुलनेत १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ मध्ये दोन हजार नमुने तापसण्यात आले. यामध्ये ३९ हिवतापाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. तसेच एप्रिल २०१९ मध्ये १७ नमुने घेण्यात आले. त्यात केवळ दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा हिवताप प्रयोगशाळा वैज्ञानिक मंजूषा देशपांडे यांनी दिली.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू पॉझिटिव्ह निरंक
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ मध्ये ३ हजार ६७९ रक्तजल नमुने घेण्यात आलेत. त्यामध्ये शहरी भागातील २ हजार ८६० व ग्रामीण भागातून ८१९ रुग्णांचा समावेश होता. यापैकी शहरी भागात ५२८ व ग्रामीण भागात १०२ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले होते. यावर जिल्हा आरोग्य यंत्रणेने विविध उपाययोजना राबविली. त्यामुळे १ जानेवारी ते ३१ मार्च २०१९ पर्यंत घेण्यात आलेल्या १७ रक्तजल मनुन्यांत एकही डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती आरोग्य सहायक जयंत माहोरे यांनी 'लोकमत'ला दिली.
रॅलीद्वारे जनजागृती
या आजारावर संशोधन करून मलेरिया जंताचा शोध सर रोनॉल्ड रॉस यांनी लावला. २५ एप्रिल रोजी ते प्रचलित झाल्याने जागतिक हिवताप दिवस याच दिवशी साजरा केला जातो. जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे डॉ. बी.एस. वावरे यांच्या नेतृत्त्वात गुरुवारी सकाळी ८ वाजता रॅली काढून जनजागृती करण्यात आली. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून रेल्वे स्टेशन चौक, राजकमल चौक व्हाया डीएचओ कार्यालयात कार्यक्रम व कार्यालयात रॅलीची सांगता झाली. यावेळी विविध सुचक संदेश फलके घेऊन कर्मचाऱ्यांनी हिवताप आजाराबाबत जनजागृती केली.