शेतीची उत्पादकता वाढविण्यावर द्यावा भर
By admin | Published: June 16, 2017 12:09 AM2017-06-16T00:09:09+5:302017-06-16T00:09:09+5:30
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, या उद्देशाने राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवीत आहेत.
पालकमंत्री : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना कृषी साहित्याचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, या उद्देशाने राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवीत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकरी हितार्थ योजना राबवून उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने कामे करावीत, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ना.पोटे यांच्याद्वारे स्वनिधीतून सोयाबीन बियाणे व रासायनिक खतांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला असून आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे.
सर्व शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी कर्जमाफीच्या निर्णयातून पाच एकर जमिनीचा निकष वगळण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुलभ पीककर्ज वितरणासह प्रभावी सिंचन सुविधाही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आरोग्य, सिंचन, रोजगारासाठी शासनाव्दारे नवीन संकल्पना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी, याकरिता सुमारे १२ हजार विद्यार्थी दत्तक घेण्यात आले असून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा पुस्तकांचा खर्च भागविता यावा यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने दरदिवशी पाच रुपयांप्रमाणे वर्षाला १,८०० रुपये जमा करावे, असे भावनिक आवाहन पालकमंत्र्यांनी केले.