जुळ्या शहरात मनोरुग्णांमध्ये वाढ
By Admin | Published: October 9, 2014 10:55 PM2014-10-09T22:55:47+5:302014-10-09T22:55:47+5:30
अचानक झालेले कौटुंबिक तथा सामाजिक आघात, अति मानसिक ताण, काही वेळा परंपरेने चालत आलेली आनुवंशिकता तर कधी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने समाजाकडून मिळणारी वागणूक
सुनील देशपांडे - अचलपूर
अचानक झालेले कौटुंबिक तथा सामाजिक आघात, अति मानसिक ताण, काही वेळा परंपरेने चालत आलेली आनुवंशिकता तर कधी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने समाजाकडून मिळणारी वागणूक अशा विविध कारणांमुळे अचलपूर-परतवाड्यात मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. काही बाहेरगावहून आलेल्या मनोरुग्णांमुळे त्यात भर पडली आहे.
समाजातील काही लोक त्यांना चिडवून स्वत:ची करमणूूक करताना दिसतात. काही मनोरुग्णांमुळे मात्र डोकेदुखी वाढली आहे. तर काही जणांकडे अंधश्रध्देतून दुर्लक्ष केले जात आहे. जुळ्या शहरात परतवाड्यातील बसस्थानक मार्ग, गुजरी, आठवडी बाजार, मिल कॉलनी स्टॉप, टिळक चौक, जयस्तंभ मार्ग तर अचलपुरात चावलमंडी, उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर, गांधी पूल, बुध्देखॉ चौक येथे हे मनोरुग्ण दृष्टीस पडतात. काही मनोरुग्णांचा मात्र चांगलाच ताप नागरिकांना सहन करावा लागतो. उपजिल्हा रुग्णालय परिसरात भटकंती करणारा एक मनोरुग्ण गप्पांमध्ये दंग असलेल्या व्यक्तीला जोरदार थप्पड लगावतो तर दुसरा मनोरुग्ण संतुलन बिघडल्यास रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचे हेडलाईट लाठी घेऊन फोडतो. हा कधी-कधी दिसून येतो तर परतवाडा बसस्थानक मार्गावर एक बसलेली महिला सारखी जोरजोरात हलत पैसे मागते. मिल राज्य महामार्गावर असलेला एक मनोरुग्ण चहावाल्याच्या कॅन्टीनजवळ दहा रुपयांची नोट जमिनीवर टाकतो मग कॅन्टीनवाले ती नोट उचलून त्याच्या कपात चहा टाकतात तो एकाच घोटात तो चहा संपवून टाकतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे मनोरुग्ण शहरात दिसत आहेत. बाहेरगावहून काही मनोरुग्ण शहरात येत आहेत. त्यामुळे मनोरुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मनोरुग्णांमध्ये काही प्रेमभंग झालेले, अति अभ्यासाचा ताण वाढलेले आहेत तसेच मनोरुग्णांमध्ये उच्च व अर्धशिक्षित महिला पुरुष आहेत. काही मनोरुग्ण स्थानिक तर काहींची शुध्द हरपली असल्याने नाव, गावाची माहिती नसते; तथापि महिला मनोरुग्णांना स्वत:चे देहभान नसल्याने समाजकंटक त्यांच्या अब्रूचा गैरफायदा घेतात. काही मनोरुग्ण नग्नावस्थेत फिरताना दिसतात.