‘रेन वाॅटर हार्वेस्टिंग’मध्ये लोकसहभाग वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:57+5:302021-06-30T04:09:57+5:30
अमरावती : शहराची भूजलपातळी वाढण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करून यासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन ...
अमरावती : शहराची भूजलपातळी वाढण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करून यासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले.
भूजलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने शहरातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी या शहरातील सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाऊस शहरात मोठ्या प्रमाणात पडतो, पण त्याची साठवणूक होणे गरजेचे आहे. त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरातील जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे गावंडे म्हणाले.
सांडपाणी, वाया गेलेले पाणी, वापरून उरलेले, गढूळ पाणी शोषखड्ड्यात मुरविले जाते. शोषखड्ड्याद्वारे पाणी आसपासच्या जमिनीत मुरते. छतावरील पावसाचे पाणी अशुद्ध होण्याअगोदर पाईपद्वारे गोळा करून फिल्टर टँकमधून गाळून निघालेले पाणी बोअरवेल किंवा विहिरीमध्ये सोडणे म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग होय, असे महापौर म्हणाले.
बॉक्स
- तर विजेच्या वापरातही होणार बचत
जलसंधारण आणि नियोजन केल्यास, पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर विसंबून राहावे लागणार नाही. जलसंधारणामुळे भूजलची पातळी वाढते व पाणी वर खेचण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण झाल्यामुळे पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होत असल्याचे महापौर म्हणाले.