प्रथमच सोयाबीनच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:43 AM2018-01-19T00:43:37+5:302018-01-19T00:43:49+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारात वाढती मागणी व डीओसीच्या दरात वाढ झाल्याने गुरुवारी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक ३१५० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर यंदाच्या हंगामात प्रथमच मिळाला.
अमरावती : आंतरराष्ट्रीय बाजारात वाढती मागणी व डीओसीच्या दरात वाढ झाल्याने गुरुवारी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक ३१५० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर यंदाच्या हंगामात प्रथमच मिळाला. मात्र, शेतकऱ्यांजवळ फारसे सोयाबीन शिल्लक नसल्याने त्यांना या भाववाढीचा फायदा होणार नसल्याचे वास्तव आहे.
बाजार समितीत गुरुवारी सोयाबीनची ६ हजार ५१ क्विंटल आवक झाली. गेल्या दोन हंगामात सोयाबीनला मिळालेला हा सर्वाधिक भाव आहे. वास्तविक, यंदाच्या हंगामासाठी ३०५० रुपये आधारभूत किंमत जाहीर केली. शासनाने जिल्ह्यातील १२ केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरू केली. मात्र, या केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीसह अटी व शर्तींचा भडिमार तसेच पेमेंटदेखील उशिरा मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल खासगी विक्रीकडेच होता.
जिल्ह्यातील नाफेड केंद्रांवर आतापर्यंत १९०० शेतकऱ्यांचे ३५ हजार १६० क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. त्याच्या तुलनेत बाजार समित्यांमध्ये आतापर्यंत ११ लाख २४ हजार ५४९ क्विंटल सोायाबीनची खरेदी करण्यात आलेली आहे.
आजचे आंतरराष्ट्रीय बाजारभाव
एनसीडीएक्स (डब्बा मार्केट) द्वारा गुरुवारी दुपारी १२ वाजता जाहिर झालेल्या दरानुसार सोयाबीनला ३३५० रुपये (बुधवारपेक्षा २८ रुपये अधिक), हरभऱ्याला ३७७४ रुपये (बुधवारपेक्षा १९ रुपयांनी कमी) प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यामुळे खासगी बाजारात दरवाढ झाल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे मागणी वाढल्याने दरवाढ झाली. डीओसीचे दरदेखील गुरुवारी वाढल्याने स्थानिक बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ झाली
- अमर बांबल
अडते, बाजार समिती, अमरावती