साखरेच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:31 PM2017-09-26T23:31:13+5:302017-09-26T23:31:26+5:30

साखरेचा कोटा कमी केल्यामुळे या योजनीतील कुटुंबांना महिन्याला फक्त एकच किलो साखर मिळणार आहे. त्यामुळे हा निर्णय गोरगरीब जनतेवर घाला घालणारा असून गरीब कुटुंब चिंतेत आहे.

 Increase in sugar prices | साखरेच्या दरात वाढ

साखरेच्या दरात वाढ

Next
ठळक मुद्देअंत्योदय योजनेतील ग्राहकांना फटका : गोरगरीब कुटुंबे संकटात, दर कमी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : साखरेचा कोटा कमी केल्यामुळे या योजनीतील कुटुंबांना महिन्याला फक्त एकच किलो साखर मिळणार आहे. त्यामुळे हा निर्णय गोरगरीब जनतेवर घाला घालणारा असून गरीब कुटुंब चिंतेत आहे. शासनाने हा निर्णय परत घ्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक करीत आहे.
केंद्र सरकारकडून बीपीएल व अंत्योदय कुटुंबांना स्वस्त दरात साखर वितरित करण्यासाठी अनुदान मिळत होते. परंतु केंद्राने आता फक्त अंत्योदय योजनेतील कुटुंबांनाच अनुदान दिले जाईल, असे राज्य सरकारला कळविले. केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने त्याचा बीपीएल कुटुंबांना फटका बसला आहे. रास्तभाव दुकानांतून त्यांना आता साखर मिळणार नाही.
अंत्योदय योजनेतील कुटुंबांची साखरही महागली आहे. त्यांना आता प्रतिकिलो १५ रुपयांऐवजी २० रुपये मोजावे लागणार आहेत. खुल्या बाजारात सध्या साखरेचे भाव ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबांना २० रुपये दराने साखर खरेदी करणे परवडणारे नाही. दुसरे असे की, पूर्वी दरमहा मानशी ५०० ग्रॅम साखर मिळत होती. त्यातही कपात करण्यात आली आहे.
आता एका कुटुंबाला एका महिन्याला फक्त एक किलो साखर दिली जाणार आहे. म्हणजे पूर्वी एका महिन्याला एका कुटुंबाला किमान दोन ते अडीच किलो साखर उपलब्ध व्हायची, ती आता फक्त एकच किलो मिळणार आहे. दसरा, दिवाळी अशा मोठ्या सणाच्या तोंडावरच गरिबांची साखर बंद करण्याचा व दर वाढविण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. हा निर्णय गोरगरीब जनतेवर अन्यायकारक असल्याने शासनाने हा निर्णय परत घ्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून जोर धरीत आहे

केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने राज्यातील दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना रास्तभाव दुकानांतून मिळणारी साखर बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आता फक्त अंत्योदय योजनेतील गरिबातील गरीब कुटुंबांना साखर मिळणार आहे. मात्र त्याचाही दर पाच रुपयांनी वाढविण्यात आला आहे.

Web Title:  Increase in sugar prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.