विषाणुजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:25 AM2018-07-27T01:25:56+5:302018-07-27T01:26:55+5:30
वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे सर्दी, खोकला, ताप व विषाणुजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्या कारणाने सर्व शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतही रुग्णांची गर्दी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे सर्दी, खोकला, ताप व विषाणुजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्या कारणाने सर्व शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतही रुग्णांची गर्दी वाढली आहे. गेल्या चार दिवसांपासून रिमझिम पावसाचे आगमन होत आहे. पाऊस पडल्याने व अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने डासांचीसुद्धा उत्पत्ती वाढली आहे. त्याचप्रमाणे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. महिन्याभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात विषाणुजन्य तापाचे २५० रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. या आजाराचे रोज १० ते १५ रुग्ण येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये याचा आकडा शेकडोने आहे. पावसाळ्यात विषाणुजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. अन्नपदार्थ व पिण्याचे पाणी सेवन करताना काळजी घेणे फार गरजेचे राहते. नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे असते.
जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जरी २५० रुग्णांची महिन्याकाठी नोंद झाली असली तरी इतर खासगी रुग्णालयांमध्ये शेकडो रुग्ण अशा आजाराने पीडित होऊन उपचार घेत आहेत.