सपन, पूर्णा चंद्रभागा, शहानूर, चारघडच्या जलसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:15 PM2019-07-29T23:15:54+5:302019-07-29T23:16:44+5:30
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सपन, पूर्णा, चंद्रभागा, शहानूर, चारघड नदी प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली. सपन नदी प्रकल्प ८० टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा पहिला व चौथा दरवाजा सायंकाळी सहाच्या सुमारास पाच सेमीने उघडला. प्रकल्प अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या गावांना सावध केले आहे.
परतवाडा : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सपन, पूर्णा, चंद्रभागा, शहानूर, चारघड नदी प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली. सपन नदी प्रकल्प ८० टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा पहिला व चौथा दरवाजा सायंकाळी सहाच्या सुमारास पाच सेमीने उघडला. प्रकल्प अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या गावांना सावध केले आहे.
सपन नदी प्रकल्पाची पाणीपातळी सकाळी ९ वाजता पाण्याची पातळी ५०८.७० मीटरवर पोहोचली होती. सायंकाळी त्यातून विसर्ग करण्यात आला. या अनुषंगाने अचलपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदारांना माहिती देण्यात आली तसेच लोकांना इशारा देण्यात आला. त्यापूर्वी नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे साहित्य उचलल्यानंतर प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात यावेत, अशा सूचना उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिल्या होत्या.
अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा धरण ४७ टक्के भरले आहे. धरणावर ९३ मिमी पावसाची नोंद आहे. शहरानूर धरण ४० टक्के भरले आहे. धरणावर ५० मिमी पावसाची नोंद आहे.
दरम्यान, रविवारी मध्यरात्रीनंतर परतवाडा-अचलपूर शहरांतून वाहणाऱ्या बिच्छन नदीला पूर आला. अमरावती रोडवरील भूगाव लगतच्या पिली नदी आणि आसेगाव लगतच्या पूर्णा नदीलाही पूर गेला. पुरामुळे बिच्छन, पिली, पूर्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
बिच्छन नदीच्या पुरामुळे अचलपूर शहरातील भैरवघाट स्मशानभूमीत पाणी घुसले, तर पावसाच्या पाण्यामुळे परतवाडातून अचलपूर शहराकडे जाणाºया दोन्ही रस्त्यांवर तीन फूटांहूनही अधिक पाणी साचले. तहसीलमागून खिडकी गेटकडे जाणाºया रस्त्यावरील पेट्रोल पंपसमोर आणि तहसीलसमोरून दुल्हागेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर चेडे ते जि.प. हायस्कूललगत हे पाणी थांबले. यात अचलपूर शहराकडे जाणारे रस्ते बंद पडलेत. वाहतूक थांबली असून, आॅटोअभावी विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही.
परतवाडा शहरातील घामोडिया प्लॉट स्थित विनोद इंगोले यांच्या घरात व फर्निचरच्या दुकानातही पाणी घुसले. अमरावती रोडवरील फातिमा कॉन्व्हेंटसमोरील स्वयंवर लॉनकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या खुल्या जागेतील झोपड्यांमध्ये पाणी घुसले.
अंजनगाव रोडवरील सावळी गावातील ६० ते ७० घरांमध्ये मध्यरात्रीनंतर ३ वाजताच्या सुमारास पाणी शिरले. या पाण्यामुळे व रस्त्याच्या कामामुळे अंजनगाव रस्ता बंद पडला आहे. परतवाड्यावरून अंजनगावकडे जाणारी वाहतूक थांबली आहे. धारणी रोडवरील गौरखेडा कुंभीतील काही घरांमध्ये पाणी घुसले आहे.