रिफाइंडमुळे वाढते चरबी, घाणा तेलाची मागणी वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:17 AM2021-08-19T04:17:22+5:302021-08-19T04:17:22+5:30
तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक, आरोग्यावर गंभीर परिणाम अमरावती : तेल हा जेवणातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. परंतु, वाढत्या महागाईमुळे ...
तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक, आरोग्यावर गंभीर परिणाम
अमरावती : तेल हा जेवणातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. परंतु, वाढत्या महागाईमुळे जेवणात सर्रास रिफाइंड तेलाचा वापर केला जात आहे. या तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक आहे. चरबी वाढण्यासह ह्रदयरोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे बहुतांश नागरिक घाणा तेलाकडे वळू लागले आहेत. परिणामी घाणा तेलाची मागणी वाढली आहे.
अशुद्ध घटक काढून टाकण्यासाठी रिफाइंड तेलावर मोठी रासायनिक प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल वाढते आणि ह्रदयाशी संबंधित विकारांना आपसुक आमंत्रण मिळते. त्यामुळे काही वर्षांमध्ये लाकडी घाण्याच्या तेलाची मागणी वाढली आहे. शहरात लाकडी घाण्याची काही मोजकीच दुकाने आहेत. घाण्यावर काढलेल्या तेलात गुड कोलेस्टेरॉल अधिक असल्याचे सांगितले जाते. मात्र, जाहिराती आणि ट्रेंडला न भुलता योग्य तेलाची निवड करणे आवश्यक ठरते.
बॉक्स
म्हणून वाढत आहेत ह्रदयरोगी
ह्रदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. लठ्ठपणा आणि चुकीचा आहार ही त्यामागील महत्त्वाची कारणे आहेत. या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी आहारात शुद्ध तेलाचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.
बॉक्स
गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी
शुद्ध तेलाचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक असलेला हाडेन्सिटी तयार होतो. आहारात शुद्ध तेलाचाच समावेश असावा. शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो. ह्रदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, सांधेदुखी, अर्धांगवायू, मेंदूचे आजार, उच्च रक्तदाब अशा गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी असल्याचे आहारतज्ज्ञ सुजय पाटील यांनी सांगितले.
बॉक्स
घाण्याच्या तेलाचा पर्याय
घाण्याचे तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. तेलबियांवर जास्त दाब देऊन हे तेल काढले जाते. घाणा एका मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो. तेलबियांतील एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. रिफाइंड तेलाला पर्याय म्हणून घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
बॉक्स
रिफाइंड तेल घातक कसे?
अनेक प्रकारचे घातक केमिकल्स वापरल्याशिवाय रिफाइंड तेल तयार होत नाही. सिंगल रिफाइंडसाठी गॅसोलिन, सिंथेटिक अँटिऑक्सिडंट, हेक्सेन अशा प्रकारचा केेमिकल्सचा वापर होत असून, ते मानवी शरीरासाठी धोकादायक ठरतो. रिफाइंड तेलाला चिकटपणा नसतो. कारण त्यातले अँटी ॲसिड आधीच बाहेर काढलेले असते.