कोरोनामुक्त गावांसाठी ग्रामपंचायतीची वाढली जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:04+5:302021-06-04T04:11:04+5:30
अमरावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेत गटांगळ्या खाऊन शहाणेन झालेली जनता दुसऱ्या लाटेच्या तडाख्याचा पडून घायाळ झाली आहे. आता ...
अमरावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेत गटांगळ्या खाऊन शहाणेन झालेली जनता दुसऱ्या लाटेच्या तडाख्याचा पडून घायाळ झाली आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक निर्बंध आणि नियम लागले तरी कोरोना शंभर टक्के आटोक्यात आलेला नाही. सुरुवातीला शहरी भागात असलेला कोरोनाचा वाढता संसर्ग आता ग्रामीण भागात वाढतो आहे. यामुळे आता ग्रामविकास विभागाने कोरोनामुक्त गाव या स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी गावपातळीवर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट या दोन्ही लाटेमध्ये नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने यशस्वी प्रयत्न केले आहेत .आतापर्यंत जिल्ह्यात ५ लाख ८४ हजार ९५८ नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यात २ जूनपर्यंत जिल्हाभरात ९२ हजार ८४९ नागरिकांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ९७,०९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जिल्ह्यात १,४६८ रुग्ण दगावले. शहरी भागातून ग्रामीण भागात कोरोनाचे लोन पसरताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगाने रुग्ण संख्या वाढली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनावर ताण वाढला होता. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे काही दिवसांत रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. एक जूनपासून काही निर्बंध शिथिल केले आहे. कोरोना रूग्णसंख्येचा वाढता आलेखही बराच कमी झाला आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बाजी मारण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामदक्षता समितीची जबाबदारी वाढली आहे.
बॉक्स
कोरोना मुक्त गावांना मिळणार विकास कामे
कोरणा मुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये,२५ लाख व १५ लाख रुपयाच्या निधीची विकासकामे मंजूर केली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी गावांची विविध २२ निकषावर गुणांकन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सर्व गावांनी सहभागी होता येणार आहे.कोरोनामुक्त गाव स्पर्धे चांगली कामगिती करणाऱ्या विभागातील पहिल्या तीन गावांना रोख स्वरूपात पारितोषिक शासनाकडे दिले जाणार आहे.