चांदूर रेल्वे शहरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:19+5:302021-07-04T04:09:19+5:30
चांदूर रेल्वे : शहरात वाढलेल्या डेंग्यूचा प्रादुर्भाव तसेच अशुद्ध पाणीपुरवठ्याबाबत शिवसेना शहरप्रमुख स्वप्निल मानकर यांच्या नेतृत्वात नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना ...
चांदूर रेल्वे : शहरात वाढलेल्या डेंग्यूचा प्रादुर्भाव तसेच अशुद्ध पाणीपुरवठ्याबाबत शिवसेना शहरप्रमुख स्वप्निल मानकर यांच्या नेतृत्वात नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शहरात सर्वत्र संचार असणाऱ्या डुकरांचा तात्काळ बंदोबस्त न लावल्यास, ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करण्याचा इशारासुद्धा शुक्रवारी देण्यात आला.
चांदूर रेल्वे शहरामध्ये डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय वर्षभरापासून शहरामध्ये पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा झालेला नाही. अनेक वेळा तोंडी तक्रार करूनही सुस्त प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय शहरामध्ये डुकरांचा मोठ्या प्रमाणात मुक्त संचार दिसत आहे. लोकांनी घेतलेली फळे, भाजीपाला व इतर खाण्याचे साहित्य गाडीला लटकवून ठेवले किंवा कापडी डिक्कीमध्ये ठेवले असता डुकरे त्याला तोंड लावतात. रस्त्यावर फिरणाऱ्या डुकरांमुळे दुर्घटना वाढल्या आहेत. लोकांच्या घरातसुद्धा शिरत असून, साथीच्या रोगांना निमंत्रण देण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. या प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल न घेतल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख स्वप्निल मानकर, किशोर यादव, राजेंद्र मेटे, आशुतोष म्हसतकर, अरविंद बेलसरे, अर्पित देशमुख, राजेंद्र मोरे, शुभम देशमुख, संदीप जरे, राजेश चौधरी, अभिनव घोंगडे, गौरव शेळके आदींनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.
(फोटो ओळ - चांदूर रेल्वे - विविध मागण्यांचे निवेदन न.प. अभियंता यांना देताना शिवसेना कार्यकर्ते)