सुकन्या समृध्दी योजनेला वाढती पसंती
By admin | Published: March 29, 2015 12:28 AM2015-03-29T00:28:20+5:302015-03-29T00:28:20+5:30
भारतीय डाक विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेची ४ हजार ५०० मुलींच्या पालकांनी आतापर्यंत खाती उघडली आहेत.
अमरावती : भारतीय डाक विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेची ४ हजार ५०० मुलींच्या पालकांनी आतापर्यंत खाती उघडली आहेत. या योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेल्या ठेवीवर ९.१ टक्के व्याजदर मिळणार आहे. पालकांनी आपल्या मुलींच्या नावे समृद्धी योजनेचे खाते उघडावे, असे आवाहन डाक सेवा विभागाने केले आहे.
मुलगी जन्माला आली म्हणजे पालकांना ती ओझे वाटायला लागते. मात्र तिच्या भवितव्यासाठी पालकांनी व्यवस्थित गुंतवणूक केली तर मुलींच्या जन्माचा आनंद कमी होणार नाही. त्यामुळे ही योजना भारतीय डाक विभागाने ३ डिसेंबर २०१४ रोजी अमलात आणली आहे.
यात २ डिसेंबर २०१३ या दिवशी किंवा या तारखेनंतर जन्मलेल्या मुलींकरिता आई-वडील किंवा कायदेशीर पालकांनी ही खाती पोस्टात उघडायची आहे. दरमहा या खात्यात कमीत कमी एक हजार व जास्तीत जास्त एक लाख ५० हजार इतकी गुंतवणूक करता येणार आहे. खाते उघडल्यानंतर १४ वर्षांपर्यंत यात भरणा करता येते. या योजनेची पूर्ण रक्कम २१ वर्षांनंतर व्याजासह मिळेल. मात्र मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मागील वर्षापर्यंत जमा असलेल्या एकूण रकमेच्या ५० टक्के रक्कम पालकांना काढता येणार आहे. या योजनेंतर्गत गुंतविलेल्या रकमेवर ९.१ टक्के व्याज दिले जाणार आहे. ही योजना गोरगरिबांकरिता अत्यंत फायद्याची असून मुलींच्या लग्नावेळी उपयोगी पडणारी आहे. त्यामुळे ही संकल्पना अनेकांना आवडली आहे. अनेकांनी खाती उघडली आहेत.
मुलगी जन्माला आली म्हणजे पालकांना होणारे टेंशन या योजनेमुळे कमी होणार आहे. या योजनेत दरमहा एक हजार रुपये गुंतवल्यास मुलीच्या भविष्यासाठी निश्चितच चांगली गुंतवणूक करता येईल.
- डी. आर. गजभिये,
प्रवर अधीक्षक,
डाकघर, अमरावती विभाग.