आजी-माजी खासदारांच्या सगे-सोयऱ्यांना दे धक्का; ‘कहीं खुशी, कहीं गम’
By गणेश वासनिक | Updated: November 25, 2024 18:37 IST2024-11-25T18:28:57+5:302024-11-25T18:37:00+5:30
Amravati Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मंथन; घराणेशाहीला कडाडून विरोध, काहींचा पक्षानेच केला गेम

Increasing nepotism in maharashtra politics; somewhere implemented successfully somewhere failed
अमरावती : यंदा राज्यात विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीचा वरचष्मा दिसून आला. आमदारांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना, तर काही आजी-माजी खासदारांनी सगे-सोयऱ्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. यामध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’ असा निकाल असल्याचे चित्र पुढे आले. राज्यात १९ आजी-माजी खासदारांच्या जवळचे नातेवाईक रिंगणात होते. यात पराभूत होणाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे.
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या भगिनी ज्याेती गायकवाड यांना धारावीतून रिंगणात उभे केले होते. त्या विजयी झाल्यात. उद्धवसेनेचे नेेते तथा खासदार संजय राऊत यांनी त्यांचे बंधू सुनील राऊत यांना विक्रोळीतून उभे केले हाेते, ते येथे विजयी झालेत. अजित पवार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांना श्रीवर्धन मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, येथे अदिती निवडून आल्या आहेत. खासदार सुनेत्रा पवार यांचे पती अजित पवार हे बारामतीतून विजयी झालेत. धनंजय महाडिक यांचे नातेवाईक अमल महाडिक हे दक्षिण कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे हे कणकवली आणि नीलेश राणे कुडाळमधून विजयी झालेत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रसचे राेहित पवार हे शरद पवार यांचे नातू कर्जत-जामखेड मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले. संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे यांनी पैठणमधून बाजी मारली. माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे भोकरदन आणि कन्या संजना जाधव या कन्नड मतदारसंघातून विजयी झाल्यात. माजी खासदार सुजय विखे-पाटील यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील हे शिर्डीतून विजयी झालेत. तर खासदार नीलेश लंके यांच्या पत्नीला पारनेरमधून पराभवाचा सामना करावा लागला.
खासदार सुप्रिया सुळे यांचे चुलतबंधू युगेंद्र पवार हे बारामतीतून पराभूत झाले. माजी खासदार प्रीतम मुंडे यांचे चुलतबंधू धनंजय मुंडे हे परळीतून विजयी झाले. रवींद्र वायकर यांच्या पत्नी पूर्व जोगेश्वरीमधून पराभूत झाल्यात. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची नणंद राेहिणी खडसे या मुक्ताईनगर येथून पराभूत झाल्यात.
वर्धा, चंद्रपूरच्या खासदारांना ‘दे धक्का’
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचे यजमान रवी राणा यांनी बडनेरातून चौकार लगावला. माजी खासदार दत्ता मेघे यांचे सुपुत्र समीर मेघे हिंगणामधून विजयी झाले. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे सुपुत्र कॅप्टन अभिजित अडसूळ हे दर्यापुरात पराभूत झाले. वर्धाचे खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयूरा काळे या आर्वीतून, तर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानाेरकर यांचे बंधू प्रवीण काकडे हे वरोरामधून पराभूत झाले. या निकालानंतर विदर्भात घराणेशाहीला काहीसा विरोध झाला, हे दर्शविते.