पीआर कार्डकरिता आजपासून बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:51+5:302021-07-12T04:09:51+5:30
परतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे अतिक्रमण नियमानुकूल करून पीआर कार्डासह घरकुलाचा लाभ मिळण्याच्या मागणीकरिता टपालपुरा व माता महाकालीनगर ...
परतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे अतिक्रमण नियमानुकूल करून पीआर कार्डासह घरकुलाचा लाभ मिळण्याच्या मागणीकरिता टपालपुरा व माता महाकालीनगर येथील रहिवासी चांगलेच आक्रमक झाले आहेत. सहा दिवसांपासून मानव हक्क संघटनेच्या नेतृत्वात अचलपूर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. धरणे आंदोलनादरम्यान सहा जणांनी त्याच ठिकाणी मुंडणही केले आहे.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी ७ जुलैला १५ ते २० महिलांनी बच्चू कडू यांच्या संपर्क कार्यालयावर जाऊन धरणे दिले. यादरम्यान बच्चू कडू उपलब्ध नसल्यामुळे कार्यालयप्रमुख भास्कर यांनी, राज्यमंत्री येताच आपल्याशी संवाद साधतील, अशी ग्वाही दिली. यामुळे महिलांनी धरणे थांबविले.
दरम्यान, मुंडण व धरणे आंदोलनाकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे १२ जुलैपासून त्याच ठिकाणी बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय मानव हक्क संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुळशीराम धुर्वे यांनी घेतला. तसे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे. पीआर कार्ड, घर टॅक्स पावती व घरकुल योजनेच्या लाभ मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय मानव हक्क संघटनेच्या नेतृत्वात टपालपुरा व माता महाकालीनगरातील रहिवासींनी घेतला आहे.
अचलपूर, परतवाडा शहराची स्वच्छता, साफसफाई, नाल्या व गटारांची सफाई, आणि वाॅर्डांत पडून असलेले कचऱ्याचे ढिगारे उचलण्याची मागणीदेखील मानवी हक्क संघटनेने केली आहे.