सुपर स्पेशालिटी परिसरात १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:26+5:302021-05-25T04:14:26+5:30

अमरावती : कोविड-१९ वरील उपचारांसाठी उपचार सुविधांत भर घालण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. याच प्रयत्नांना अमेरिकन ...

Independent hospital with 100 beds in super specialty area | सुपर स्पेशालिटी परिसरात १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय

सुपर स्पेशालिटी परिसरात १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय

Next

अमरावती : कोविड-१९ वरील उपचारांसाठी उपचार सुविधांत भर घालण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. याच प्रयत्नांना अमेरिकन इंडिया फौंडेशनची साथ लाभली असून, पुढील दोन महिन्यांत १०० खाटांचे स्वतंत्र रूग्णालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी दिली.

जिल्ह्यात उपचार यंत्रणांचा विस्तार करताना सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून विविध संस्था-संघटनांनी पुढे येण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात आले आहे. पालकमंत्री ठाकूर यांच्याकडून यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. त्यानुसार अमेरिकन इंडिया फौंडेशनकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सहकार्य मिळाले असून, रुग्णालयाचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक उपचार सुविधा गतीने उभारण्यात येत आहेत. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या परिसरात हे नवे स्वतंत्र रुग्णालय उभे राहणार आहे. त्यात १०० खाटा असतील. त्यातील अतिदक्षता कक्षातील १० खाटांचा समावेश आहे.

रुग्णालयाची जागा निश्चित करण्यात आली असून, त्याठिकाणी फौंडेशन उभारणीचे काम सुरु करण्यात येत आहे. त्यानंतर फायबर सिमेंट फ्लोअरिंग, ॲल्युमिनीअम कंपोझिट पॅनेलच्या सहकार्याने ही इमारत उभारण्यात येणार आहे. त्याचा तयार ढाचा बाहेरून आणून तो बसविण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षित इमारत गतीने उभी राहू शकेल. रुग्णालयाची इमारत ऑक्सिजन सुविधेसह सर्व अद्ययावत सोयींनी सुसज्ज असेल.

फोर झोन स्ट्रॅटेजीवर आधारित रचना

रुग्णालयाची रचना फोर झोन स्ट्रॅटेजीवर आधारित असेल. झोन एकमध्ये डॉक्टर्स व हेल्थ केअर वर्कर्सचे कार्यालय, थांबण्याची व्यवस्था असेल. झोन दोनमध्ये बाह्य रुग्ण विभाग व आरटीपीसीआर, तसेच अँटिजेन टेस्टिंगच्या सुविधा असेल. तसेच तिथे लक्षणे असणा-या, मात्र चाचणी अहवाल प्राप्त न झालेल्या रुग्णांचा कक्ष असेल. झोन तीनमध्ये बाधितांसाठी विलगीकरण व उपचार कक्ष असेल. झोन चारमध्ये व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन पाईपलाईन, काँन्सट्रेटर्स, अतिदक्षता कक्ष उपलब्ध असेल. तिथे गंभीर रुग्णांवर उपचार होतील. त्याशिवाय, प्रतीक्षा कक्ष, कन्सल्टेशन रुम, एक्झामिनेशन वॉर्ड आदी कक्षही असतील. रुग्णालयात हवा खेळती राहण्यासाठी टर्बो व्हेंटिलेटर्स असतील. त्याशिवाय, आयसीयू वॉर्ड पूर्णत: वातानुकूलित असेल.

कोट

संपूर्ण प्रकल्पाचे क्षेत्र १५ हजार फूट असून, त्यात आयसोलेशन वॉर्डचे क्षेत्र ५ हजार ६०० फूट व सर्विस एरिया ७ हजार ८०० फुटांचा आहे. संपूर्ण रुग्णालय उभारणी ‘अमेरिकन इंडिया’कडून होत असून, हे रुग्णालय लवकरच उभे राहणार आहे. रुग्णालयासाठी मनुष्यबळ, पाणी, ऑक्सिजन, वीज आदींबाबत आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे.

डॉ. श्यामसुंदर निकम

जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Independent hospital with 100 beds in super specialty area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.