अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष किरण सरनाईक विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:19 AM2020-12-05T04:19:54+5:302020-12-05T04:19:54+5:30
तिरंगी लढतीत महाआघाडीचे देशपांडे पराभूत, भोयर तिसऱ्या स्थानी अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी चुरशीच्या झालेल्या तिरंगी ...
तिरंगी लढतीत महाआघाडीचे देशपांडे पराभूत, भोयर तिसऱ्या स्थानी
अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी चुरशीच्या झालेल्या तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी झाले. महाआघाडीचे उमेदवार व मावळते आमदार श्रीकांत देशपांडे यांचा सरनाईक यांनी ३,२४२ मतांनी पराभव केला. दुसऱ्या पसंतीच्या मतांचा क्वालिफाईंग कोटा सरनाईक यांनी पूर्ण केला. अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांनी २५ व्या फेरीपर्यंत तिसऱ्या स्थानावर जोरदार झुंज दिली. भाजपचे उमेदवार नितीन धांडे २२ व्या फेरीत बाद झाले.
स्थानिक विलासनगरातील शासकीय गोदामात गुरुवारी सकाळी ८ पासून सुरू असलेली मतमोजणीची प्रक्रिया ४० तासांपर्यंत सुरू होती. निवडणूक रिंगणात २७ उमेदवार होते. दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठीच्या फेरीत २५ उमेदवार बाद आल्यानंतर अंतिम दोन उमेदवारांमध्ये किरण सरनाईक यांना पहिल्या व दुसऱ्या पसंतीची १२,४३३ मते व श्रीकांत देशपांडे यांना ९१९१ मते मिळाली. विजयासाठी निश्चित करण्यात आलेला १४,९१६ मतांचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे देशपांडे यांच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या क्रमांकाच्या मतांची मोजणी करण्याची औपचारिकता शुक्रवारी उशिरापर्यंत केली जात असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
कोण आहेत किरण सरनाईक?
किरण सरनाईक हे वाशिम जिल्ह्यातील. माजी आमदार स्व. मालती सरनाईक यांचे किरण हे पुत्र. दर्यापूर मतदारसंघाच्या माजी आमदार स्व. कोकिळाबाई गावंडे आणि किरण सरनाईक यांच्या आई मालतीबाई या सख्ख्या बहिणी. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ते आतेभाऊ आहेत. अकोला-वाशिम संयुक्त जिल्हा असताना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद त्यांनी भूषिवले. त्यांची शिक्षण संस्था असून, ते स्वत: शिक्षकही आहेत.