श्रीक्षेत्र रिद्धपूर विकासासाठी स्वतंत्र आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:15 AM2021-06-09T04:15:22+5:302021-06-09T04:15:22+5:30

पर्यटन विकास महामंडळाच्या कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा, नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून विकास करा अमरावती : श्रीक्षेत्र रिद्धपूर विकासासाठी स्वतंत्र आराखडा करण्यात ...

Independent plan for development of Shrikshetra Ridhpur | श्रीक्षेत्र रिद्धपूर विकासासाठी स्वतंत्र आराखडा

श्रीक्षेत्र रिद्धपूर विकासासाठी स्वतंत्र आराखडा

Next

पर्यटन विकास महामंडळाच्या कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा, नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून विकास करा

अमरावती : श्रीक्षेत्र रिद्धपूर विकासासाठी स्वतंत्र आराखडा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी आराखड्यानुसार कामे पूर्ण करतानाच पर्यटनस्थळावरील स्थानिक बाबींचा समग्र विचार करून पर्यटनवाढीच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी येथे दिले.

पर्यटन विकास महामंडळाची ऑनलाईन बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आ. देवेंद्र भुयार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नरेंद्र जिचकार, कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, पर्यटन विकास महामंडळाचे विवेकानंद काळकर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्याला मोठा पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबरच, निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध वनांचा जिल्ह्यात समावेश आहे. त्यामुळे पर्यटन विकासाच्या मोठ्या शक्यता आहेत. त्या लक्षात घेऊनच प्राचीन वारसा जपणे व उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह पर्यटनाला चालना देणे यासाठी जेजे स्कूलच्या कलावंतांच्या सहकार्याने वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. विविध ठिकाणी विकास आराखड्यातून कामे होत आहेत. मात्र, पर्यटन विकास महामंडळानेही यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवल्या पाहिजेत. मोझरी, रिद्धपूर अशा विविध ठिकाणी स्थानिक पातळीवरील वैशिष्ट्ये अधोरेखित करणारे उपक्रम राबवावेत. रिद्धपूर येथील विविध स्थळांचा विकास साधताना तेथील तलावाचेही सौंदर्यीकरण करावे. आराखड्यातील निधीबरोबरच पर्यटननिधीही वापरावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

------------------

दुर्मीळ हस्तलिखितांचा ठेवा जतन करा

पौराणिक स्थळी तसेच संस्थांकडे दुर्मीळ हस्तलिखित पोथ्या उपलब्ध आहेत. अनेक पोथ्यांचा लेखनकाल पौराणिक आहे. हा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी त्यांचे डिजिटायझेशन होणे आवश्यक आहे. विविध तज्ज्ञांची मदत घेऊन हस्तलिखितांच्या डिजीटायझेशनचे काम पूर्ण करावे, जेणेकरून हा ठेवा जतन होईल व अभ्यासकांसाठी उपलब्ध राहील.

पर्यटनस्थळी विकासकामे हाती घेताना परिसरातील विविध गोष्टींचा विचार करून पर्यटनवाढीच्या सर्व शक्यता तपासल्या पाहिजेत. परिसरातील तळी, नैसर्गिक उद्याने, मोकळ्या जागा अशा विविध जागांचा विकास केल्यास पर्यटकांसाठी नानाविध आकर्षणस्थळे निर्माण होतील व पर्यटनाला चालना मिळेल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

--------------------

रिद्धपूर विकास आराखड्यात विविध ठिकाणांचा समावेश

महानुभावपंथीयांची काशी, गोविंदप्रभू यांचे देवस्थान व मराठी भाषेसाठीचे महात्म्य स्थळ असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूरच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा राबविण्यात येत आहे. रिद्धपूर विकास आराखडा सर्वांगीण व सविस्तर झाला पाहिजे. वरूड-मोर्शी तालुक्यातील महानुभावपंथाच्या सर्व ठिकाणांचा विकास व्हावा, या हेतूने समग्र तपशिलासह आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार भुयार यांनी दिली.

श्रीक्षेत्र रिद्धपूर तिर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार, श्री गोविंदप्रभू यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यासाठी थीम पार्क तसेच महानुभाव पंथाशी संबंधित विविध स्थळांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्याचा निर्णय यावेळी झाला. आराखड्यात भक्त निवास, आरोग्य सुविधा अनुषंगाने रुग्णालय, पर्यटन विकास अंतर्गत येणारे उपक्रम, प्रवासी निवारा, रेल्वे स्टेशनसंदर्भात पाठपुरावा, एम.आर.ई.जी.एस. अंतर्गत येणारे उपक्रम, वृक्षारोपण, शासकीय निवासस्थान, आश्रमशाळा, बुद्धविहार, विपश्यना केंद्र, ईदगाह, सांस्कृतिक भवन, सभागृह तसेच प्राथमिक सुविधा यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

000

Web Title: Independent plan for development of Shrikshetra Ridhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.