भारतीय रेल्वेची मोहोर उमटली अन् चाके थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 06:00 AM2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:45+5:30
२०१८ मध्ये या रेल्वेवर शकुंतला सवारी गाडीसह भारतीय रेल्वेची मोहोर चढविली गेली. एरवी ब्रिटिश कंपनीकडे असणाऱ्या रेल्वेवर भारतीय रेल्वेची मोहोर बघून सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या. आता शकुंतलेला सुगीचे दिवस येतील, असे सर्वांनाच वाटले. पण, तसेच झालेच नाही. भारतीय रेल्वेची मोहोर चढल्यानंतर अवघ्या एक वर्षातच भारतीय रेल्वेने तिला कायमची बंद केली.
अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर ते मूर्तिजापूर दरम्यान नॅरोगेज लोहमार्गावर धावणाऱ्या शकुंतला रेल्वे गाडीकरिता ‘भारतीय रेल्वे’ असे नामाभिधान अल्पजीवी ठरले. आता शकुंतलेचा प्रवास कायमचा बंद करण्यात आला आहे. भौगोलिक संदर्भ, लोकभावना आणि सांस्कृतिक वारसा या बाबी पायदळी तुडविल्या गेल्या आहेत.
इंग्रज राजवटीत अचलपूरला ही रेल्वे मिळाली. १९१६ पासून ती धावत राहिली. मेसर्स क्लिक अॅन्ड निक्सन कंपनीकडे ही रेल्वे होती. २०१८ मध्ये या रेल्वेवर शकुंतला सवारी गाडीसह भारतीय रेल्वेची मोहोर चढविली गेली. एरवी ब्रिटिश कंपनीकडे असणाऱ्या रेल्वेवर भारतीय रेल्वेची मोहोर बघून सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या. आता शकुंतलेला सुगीचे दिवस येतील, असे सर्वांनाच वाटले. पण, तसेच झालेच नाही. भारतीय रेल्वेची मोहोर चढल्यानंतर अवघ्या एक वर्षातच भारतीय रेल्वेने तिला कायमची बंद केली.
एकमेव खासगी रेल्वे मार्ग
दर दहा वर्षांनी मेसर्स क्लिक अॅन्ड निक्सन या खासगी कंपनीसोबत शकुंतला रेल्वे गाडीच्या आवागमनाचा करार वाढविला गेला. खरे तर १९१६ चा करार ३१ मार्च १९४७ रोजीच रद्द करता आला असता. परंतु, १ एप्रिल १९४७ पासून दर दहा वर्षांनी करार वाढत गेला. २०१६-१७ पर्यंत हा करार वाढविल्या गेला.
मुदतवाढ देण्यापूर्वी १२ महिन्यांची आगाऊ नोटीस देवून भारतीय रेल्वेला हा मार्ग विकत घेता आला असता. पण, तसेही झाले नाही. रेल्वेच्या राष्ट्रियीकरणाच्या वेळी ब्रिटिशांकरिता सुगीचा ठरलेला हा मार्ग दुर्लक्षित राहिला. आता देशातील हा एकमेव खासगी रेल्वे मार्ग ठरला.
‘ते’ फुलांचे हार अखेरचे ठरलेत
शकुंतलेच्या उद्धाराकरिता १६ डिसेंबर २०१८ ला धावत्या रेल्वेत साहित्यिकांनी शब्दांचा जागर मांडला. कविता सादर केल्या. याकरिता अचलपूर रेल्वे स्थानकावर शकुंतलेला फूल आणि हारांनी सजविले गेले. फुलांच्या हारांची चादर शकुंतलेवर चढविल्या गेली. याप्रसंगी लोकप्रतिनिधींनीही शकुंतलेतून प्रवास केला. शकुंतलेत ‘भारतीय रेल महान, प्रगती की है पहचान’ हे गाणे डब्याडब्यातून ऐकविल्या गेले. पण, शकुंतलेवर चढविल्या गेलेले हे फुलांचे हार, केल्या गेलेले भारतीय रेल्वेचे गुणगानही अखेरचे ठरले. यानंतर काही महिन्यातच शकुंतला रेल्वे गाडी बंद करण्यात आली.
प्रचारादरम्यान विसर
प्रत्येक निवडणुकीत प्रचारादरम्यान शकुंतलेच्या ब्रॉडगेजचा प्रश्न उमेदवारांनी उचलला. मतदारांना याबाबत आश्वस्तही केले. पण, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ही शकुंतला उमेदवारांच्या प्रचाराचा मुद्दाच ठरला नाही. प्रचारादरम्यान बंद पडलेल्या शकुंतलेचा विसरच त्यांना पडला. शकुंतलेचा मुद्दा पुढे करीत अनेकांनी यापूर्वी निवडणुका जिंकल्या आहेत, हेही तेवढेच खरे.
राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची
नियोजन आयोगाच्या सूचनेनुसार, शकुंतला रेल्वे मार्गाच्या ब्रॉडगेजकरिता ५० टक्के आर्थिक भार राज्य शासनाला उचलायचा होता. २०१४ पासून रेल्वे मंत्रालयाला या अनुषंगाने होकारच मिळाला नाही आणि अखेर हा रेल्वे मार्गच बंद केला गेला. यामुळे या मार्गावर असलेल्या शेकडो गावांचा प्रगतीचा मार्गदेखील खुंटला आहे.
सुरक्षिततेचे कारण
शकुंतलेला चालविण्याच्या मानसिकतेत नसलेल्या भारतीय रेल्वेने सुरक्षिततेचे कारण पुढे करीत ही रेल्वे बंद केली आहे. यात ब्रॉडगेडचे स्वप्न पाहणाऱ्यांकडून ही नॅरोगेजही काढून घेण्यात आली आहे. रेल्वे मार्ग वाहतुकीस योग्य नाही; मार्गातील लहानमोठ्या १५ पुलांपैकी काही पूल धोकादायक आहेत, असा अभिप्राय देत हा रेल्वे मार्ग रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी बंद केला आहे.