देशातील पहिल्या डिजिटल संत्रा मंडईला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 05:38 PM2024-02-15T17:38:16+5:302024-02-15T17:38:25+5:30

वरुडात बाजार समिती आणि फ्रूटएक्स कंपनीचा उपक्रम, दिवसाला १०० टन लिलाव

India's first digital orange market launched | देशातील पहिल्या डिजिटल संत्रा मंडईला प्रारंभ

देशातील पहिल्या डिजिटल संत्रा मंडईला प्रारंभ

- संजय खासबागे

वरूड (अमरावती) : संत्राबागांवर रोगराई ओसरल्यानंतर आता अवकाळी पावसामुळे बहराला ताण न बसणे आणि त्यातच निर्यातीतील अडचणी असल्याने व्यापाऱ्यांकडून मिळत असलेला कमी दर या बाबीतून होणारी संत्राउत्पादकांची कुचंबणा थांबविण्यासाठी देशातील पहिली संत्रा डिजिटल मंडई वरुडात स्थापन झाली आहे. शेतकऱ्यांना आणलेल्या संत्र्याला ग्रेडेशननुसार वेगवेगळ्या वर्गवारीत टाकले जात असल्याने किरकोळ संत्र्यालाही हमखास दर येथे मिळत आहे. खासगी संस्थेच्या सहकार्याने उभारलेल्या या उपक्रमामुळे संत्रा उत्पादकांना नवसंजीवनी मिळाली आहे. 

वरूड, मोर्शी तालुक्यात आंबिया आणि मृग बहारच्या संत्र्याचे हजारो टन उत्पादन घेतले जाते. परंतु ऐनवेळी परप्रांतासह बांगलादेशात भाव कोसळले की, याचा फटका थेट संत्रा उत्पादकांना बसतो. यंदा व्यापारीदेखील संत्राबागेकडे फिरकले नसल्याचे चित्र आहे. हे टाळण्यासाठी डिजिटल संत्रा मंडईसाठी वरूड कृषिउत्पन्न बाजार समिती आणि फ्रूट एक्स कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.

कंपनीकडून स्थापित यंत्रातून संत्र्याचे आकारानुसार ग्रेडिंग करून ते क्रेटमध्ये आपोआप पडतात. त्यानंतर त्याचा देशाच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित व्यापारी तसेच त्यांचे प्रतिनिधी यांच्यामार्फत लिलाव केला जातो. यामुळे संत्र्याला चांगला दर मिळत आहे. देशातील पहिली डिजिटल संत्रा मंडई म्हणून येथील बाजार समितीच्या संत्रा मंडईला मान मिळाला. ग्रेडेशनमुळे टाकाऊ संत्रीसुद्धा विकली जात आहेत. याचा संत्रा उत्पादकांना फायदा होत असून दिवसाला १०० टन संत्री विकली जात आहेत. 

देशांतर्गत सफरचंदासह विविध फळांचे ग्रेडेशन, विक्री करणाऱ्या हैदराबाद येथील फ्रूट एक्सने विदर्भाचा कॅलिफोर्निया असलेल्या वरूड परिसरात पहिल्यांदाच संत्र्याच्या लिलावासाठी सामंजस्य करार केला आहे. कंपनीने बाजार समितीच्या संत्रा लिलाव मंडईमध्ये ग्रेडिंग युनिट उभारले. यामध्ये ७५ पैसे प्रतिकिलो दराने संत्रा ग्रेडिंग, भराई आणि ग्रेडिंगनुसार लिलाव करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. प्रतवारीनुसार संत्रा विक्री करून वेळीच शेतकऱ्यांना पैसे दिल्या जाते.

मिळतो योग्य दर
डिजिटल संत्रा लिलाव मंडईमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या संत्र्याचे ग्रेडेशन होऊन ते क्रेटमध्ये पडतात आणि त्यानंतर विकले जातात. सर्वोच्च गुणवत्तेच्या फळांसाठी लिलावात ४५ ते ४० रुपये किलो दर मिळतो, तर निम्नस्तर संत्रीसुद्धा २० रुपये किलोने जातात. 

आता शेतकरीच घेऊन येतात संत्री 
पूर्वी संत्राबागेतील फळे उतरविण्यासाठी व्यापाऱ्यांची प्रतीक्षा शेतकऱ्यांना असायची. आता थोडा त्रास होत असला तरी योग्य दर मिळत असल्याने शेतकरी संत्री मंडईत आणत असल्याचे चित्र आहे. 

देशात पहिला डिजिटल संत्रा बाजार संत्रा उत्पादकांना फायदेशीर ठरला आहे. पारदर्शक लिलाव पद्धत, ग्रेडेशन करून विक्री केली जाते. त्याचा जिल्हाभरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा.
- नरेंद्र पावडे, बाजार समिती सभापती, वरूड

Web Title: India's first digital orange market launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.