फेब्रुवारीत महाविद्यालये सुरू होण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:14 AM2021-01-20T04:14:59+5:302021-01-20T04:14:59+5:30
अमरावती : कोरोना संसर्गामुळे मार्चपासून बंद झालेली वरिष्ठ महाविद्यालये फेब्रुवारीत सुरू होतील, असे संकेत उच्च शिक्षण विभागाने दिले ...
अमरावती : कोरोना संसर्गामुळे मार्चपासून बंद झालेली वरिष्ठ महाविद्यालये फेब्रुवारीत सुरू होतील, असे संकेत उच्च शिक्षण विभागाने दिले आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संचालक धनराज माने यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उच्च शिक्षण सहसंचालकांचा विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत आढावा घेतला. या बैठकीत महाविद्यालये सुरू करण्याविषयी विभागनिहाय चर्चा करण्यात आली. कोरोना कमी होत असल्याने वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास
काही अडचणी किंवा आक्षेप येतील का, याबाबत यावेळी मंथन झाल्याची माहिती आहे. काही प्रकरणे न्यायालयीन
प्रक्रियेत असल्याने त्यांचा त्वरेने निपटारा कसा करता येईल, यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या. आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू हाेत असल्याने शिक्षणप्रवाह सुरळीत होत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यामुळे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन फेब्रुवारीपासून वरिष्ठ महाविद्यालये सुरू करता येईल, असा सूर या बैठकीतून पुढे आला.
------------------
शासनमान्यतेनंतरच वरिष्ठ महाविद्यालये सुरू करता येईल. कोरोना नियमावलींचे पालन करुन फेब्रुवारीपासून ती सुरू करण्यास काहीही हरकत नाही.
- केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण अमरावती.