राज्यात वाघांची आकडेवारी वाढण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 07:00 AM2022-05-18T07:00:00+5:302022-05-18T07:00:06+5:30

Amravati News सोमवारी बुद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी गणना आटोपली आहे. त्यामुळे राज्यात वाघांची अचूक आकडेवारी पुढे येणार आहे. प्राथमिक अहवालानुसार वाघांची संख्या दुप्पट झाल्याचे शुभसंकेत मिळत आहेत.

Indications of increase in tiger statistics in the state | राज्यात वाघांची आकडेवारी वाढण्याचे संकेत

राज्यात वाघांची आकडेवारी वाढण्याचे संकेत

googlenewsNext
ठळक मुद्देप्रगणनेचा अहवाल तयार

गणेश वासनिक

अमरावती : गेल्या तीन वर्षांनंतर राज्यात वाघांची ऑनलाईन प्रगणना झाली. सोमवारी बुद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी गणना आटोपली आहे. त्यामुळे राज्यात वाघांची अचूक आकडेवारी पुढे येणार आहे. प्राथमिक अहवालानुसार वाघांची संख्या दुप्पट झाल्याचे शुभसंकेत मिळत आहेत.

डेहराडून येथील वन्यजीव संस्थेच्या निर्देशानुसार, देशात एकाच वेळी वाघांची ऑनलाईन प्रगणना करण्यात आली. त्याकरिता वाईल्ड लाईफ संस्थेने एक ॲप विकसित करून दिले होते. सात दिवसांत वाघांसह अन्य वन्यजीवांच्या प्रगणनेची नोंद करण्यात आली आहे. ही प्रगणना क्षेत्रीय स्तरावर करण्यात आल्याने वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. राज्याच्या पाचशे वनपरिक्षेत्रात सात दिवस सतत ही मोहीम राबविण्यात आली. प्रगणनेचा ऑनलाईन डेटा डेहराडून येथे पाठविण्यात आला आहे. वाघांची रीतसर माहिती समोर आल्यानंतर वन्यजीव विभागाचे प्रमुख ती माहिती जाहीर करतील. मात्र, राज्यात वाघांची आकडेवारी पाचशेच्या वर जाण्याचे संकेत आहेत.

ताडोबा-टिपेश्वर नंबर १

वाघांच्या संख्येसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प नंबर १ वर आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य देखील वाघांच्या बाबतीत सरस ठरत आहे. कारण टिपेश्वर येथे नवतरुण वाघांची संख्या ३५ च्या आसपास गेल्याची माहिती आहे.

चंद्रपूर- ताडोबा- टिपेश्वर हा वाघांचा कॅरिडाॅर झाला आहे. चंद्रपूरचे वाघ टिपेश्वरपर्यंत प्रवास करीत आहेत. ताडोबात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातसुद्धा वाघांची संख्या १५ टक्क्यांनी वाढण्याचे संकेत आहेत. पेंच, सह्याद्रीत वाघांची संख्या ५ टक्के वाढणार आहे.

संरक्षण आणि संघर्ष

विदर्भात वाघांची संख्या ४०० च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. ताडोबा, टिपेश्वर, नागझिरा, नवेगाव बांध, यवतमाळ, वणी, वरोरा, उमरेड, करांडला, बुलडाणा, किनवट या भागात वाघांची संख्या २ ते १० इतकी आहे. या भागात चंद्रपूर, ताडोबा येथून वाघ येत असल्याची माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानव- वन्यजीव संघर्ष टोकाला गेला आहे.

प्रगणना आटोपली असली तरी अद्यापही अहवाल मिळाला नाही. अहवाल आल्यानंतर वन्यजीवनिहाय वर्गवारी केली जाणार आहे. त्यानंतर वाघ, बिबट आणि इतर वन्यप्राण्यांची संख्या निश्चित होईल. राज्याचे पर्यावरणीय वातावरण बघता वाघांची संख्या वाढेल, यात दुमत नाही.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र.

Web Title: Indications of increase in tiger statistics in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ