अमरावती जिल्ह्यात कोरानामुक्त महिलेवर अप्रत्यक्ष बहिष्कार; महिला व बाल कल्याणमंत्र्यांचा कारवाईचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 06:40 PM2020-07-08T18:40:54+5:302020-07-08T18:41:53+5:30
दीड महिन्यांपूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगावपेठ येथील एका महिलेच्या कुटुंबावर तेथील नागरिकांनी अप्रत्यक्षपणे बहिष्कार टाकल्याची घटना उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दीड महिन्यांपूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगावपेठ येथील एका महिलेच्या कुटुंबावर तेथील नागरिकांनी अप्रत्यक्षपणे बहिष्कार टाकल्याची घटना उघडकीस आली. महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी त्या महिलेची घरी जाऊन भेट घेतली. शासन पाठीशी असल्याचा विश्वास महिलेला दिला. कोरोना हा उपचारांती बरा होणारा आजार आहे. त्यामुळे सामाजिक बहिष्काराची भाषा वापरल्यास, तशी मानसिकता बाळगल्यास कठोर कारवाई करेन, असा इशारा त्यांनी दिला.
स्वत: सोडून इतर सर्वांना कोरोना होण्याची शक्यता आहे, असे समजून कुणीही वागू नये. या आजाराची जोखीम सर्वांना समान आहे. त्यामुळे कुणी बाधित होत असेल, तर संवेदना बाळगली पाहिजे. हा आजार उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आहे, हे एक शास्त्रीय सत्य आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या आपल्याच एका भगिनीला वाळीत टाकण्याची भावना बाळगणे हाच मुळात एक मानसिक आजार आहे. त्यामुळे कुणीही बहिष्काराची मानसिकता बाळगू नये व कारवाई करायला भाग पाडू नये, असे आवाहन ना. ठाकूर यांनी केले. याबाबत धोरणात्मक उपायांसाठी शासनस्तरावर हा विषय मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णांना सन्मानजनक वागणूक द्या
कोरोनामुक्त झालेल्या या महिलेची व तिच्या कुटुंबाची प्रकृती ठणठणीत असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे. कोरोनाची कुठलीही लक्षणे आता त्यांच्यात नाहीत. अशावेळी नागरिकांनी त्या भगिनीला हीन वागणूक देणे हा गुन्हा आहे. दवाखाने, रुग्णालये यांनीही रुग्णांना सन्मानजनक वागणूक द्यावी. यानंतर इतरत्र कुठेही असा प्रकार घडता कामा नये. तसे घडलेच तर कठोर कारवाई करू, असा इशारा ना. ठाकूर यांनी दिला.ल्ल