अमरावतीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह खासगी डॉक्टरचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 07:09 PM2020-05-14T19:09:53+5:302020-05-14T19:10:18+5:30
अमरावतीमध्ये ५ मे रोजी पॉझिटिव्ह झालेल्या ताजनगरातील ४४ वर्षीय खासगी डॉक्टरचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता १३ झालेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील क्लस्टर हॉटस्पॉटलगत खरकाडीपुऱ्यातील एका २८ वर्षीय महिलेचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९० वर पोहोचली आहे. ५ मे रोजी पॉझिटिव्ह झालेल्या ताजनगरातील ४४ वर्षीय खासगी डॉक्टरचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता १३ झालेली आहे.
क्लस्टर हॉटस्पॉटमध्ये ताजनगर कंटेनमेंटमध्ये ८० वर्षीय वृद्धाची होम डेथ झाली होती. मृताचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाईन केले होते. यामध्ये खासगी वैद्यकीय व्यावयासी असलेला मृताच्या मुलाचा समावेश होता. त्यांचा अहवाल ५ मे रोजी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
पॉझिटिव्ह निष्पन्न झालेली खरकाडीपुरा येथील २८ वर्षीय महिला कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईनमध्ये होती. तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठविलेला अहवाल गुरुवारी दुपारी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.