वरूडमध्ये संत्र्यावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव
By Admin | Published: August 11, 2016 12:07 AM2016-08-11T00:07:59+5:302016-08-11T00:07:59+5:30
बदलत्या वातावरणाने अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा आंबिया बहाराला गळती लागल्याने...
आंबिया बहराला गळती : कृषी विभागाद्वारे व्हावे सर्वेक्षण
वरुड : बदलत्या वातावरणाने अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा आंबिया बहाराला गळती लागल्याने संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. संत्रा गळतीचे प्रमाण ५० टक्के असल्याने या संकटातून कसे सावरायचे? असा प्रश्न संत्रा उत्पादकांपुढे उभा ठाकला आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण करून कृषी विभागाने तातडीच्या उपाययोजना सुचविण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टर जमिनीत संत्रा झाडे आहेत. यापैकी २१ हजार ५०० हेक्टर जमिनीवर फळे देणारी संत्रा झाडे आहेत. संत्र्याचे दोन बहार संत्रा उत्पादक घेतात. यामध्यो आंबिया बहार जानेवारीमध्ये येतो तर दुसरा मृग बहार मृग नक्षत्रामध्ये निसर्गावर अवलंबून असतो. यावर्षी सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने मृग बहाराचे संत्रा पीक आले नाही. मात्र, डिसेंबरपासून तापमानात वाढ झाल्याने तडी दिलेल्या संत्रा झाडावर आंबिया बहार चांगला फुलला होता. उन्हाळयात अतिउष्णतापमान असताना सुद्धा संत्रा उत्पादकांनी पाण्यासारखा पैसा खर्च करुन आंबिया बहार टिकविला.
मात्र, अल्पशा पावसामुळे बुरशी, फायटोपथोरा तसेच देठतुटीसह अज्ञात रोगांनी थैमान घातल्याने संत्रा आंबिया बहाराला मोठ्या प्रमाणात गळती सुरु आहे. ओल्या दुष्काळामुळे संत्रा उत्पादकांच्या हातचे नगदी पीक जाण्याची शक्यता बळावली आहे. गळलेला संत्रा दिवसागणिक शेतकऱ्यांची चिंता वाढवित असल्याने यावर उपाययोजना सुचविण्याकरीता कृषी विभागाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे.
संत्रा उत्पादन घेणाऱ्या पंढरी,सावंगी,गणेशपूर,जामठी,वरुड, सुरळी, आमनेर, एकदरा, झटामझिरी, पिंपळशेंडा, आंतरखोप, बहादा, वाई, राजुराबाजार, हातुर्णा, उदापूर, बेनोडा,बारगांव, जामगांव, बेनोडा, लोणी, जरुड, टेंभुरखेडा, गव्हाणकुंड, तिवसाघाट, शेंदूरजनाघाट, पुसला, लोहदरा, देऊतवाडा परिसरातील संत्रा बागांमधील आंबिया बहाराची मोठया प्रमाणात गळती सुरु असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिपावसामुळे अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ५० टक्के आंबिया बहार गळाला आहे. शासनाने कृषी विभागाची पथके पाठवून रोगाचे कारण शोधून उपाय सुचविणे तसेच संकटात सापडलेल्या संत्रा उत्पादकांना मदत करणे गरजेचे आहे. अन्यथा मेटाकुटीस आलेला संत्रा उत्पादक पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांना सावरण्यासाठी तातडीने नुकसानभरपाई देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)