‘खावटी’चा निकृष्ट किराणा अपर आयुक्तांच्या टेबलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:26 AM2021-09-02T04:26:42+5:302021-09-02T04:26:42+5:30
शासन आदिवासींना मूर्ख समजते का? खावटी किराणा किटमध्ये लाखोंचा गैरव्यवहाराचा आरोप अमरावती : नजीकच्या शिराळा येथील खावटी योजनेंतर्गत आदिवासी ...
शासन आदिवासींना मूर्ख समजते का? खावटी किराणा किटमध्ये लाखोंचा गैरव्यवहाराचा आरोप
अमरावती : नजीकच्या शिराळा येथील खावटी योजनेंतर्गत आदिवासी कुटुंबांना वाटप झालेल्या किराणा किटमधील साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे आदिवासी महिला, पुरुषांनी मंगळवारी येथील अपर आयुक्तांकडे धाव घेतली आणि खावटीचा निकृष्ट किराणा टेबलवर टाकून कैफीयत मांडली. दरम्यान एटीसी सुरेश वानखेडे यांनी यासंदर्भात तक्रार द्या, किराणा प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवू, अशी ग्वाही दिली.
राज्य शासनाने कोराेनाकाळात राेजगार गमावलेल्या आदिवासी बांधवांना दोन हजारांची किराणा किट आणि बँकेत दाेन हजार रुपये जमा असा उपक्रम राबविला. त्यानुसार पात्र अधिवासी बांधवांच्या खात्यात दोन हजार रुपयांचे अनुदान जमा होत आहे. मात्र, नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळामार्फत पाठविण्यात आलेली किराणा किट अतिशय निकृष्ट दर्जाच्या असल्याचे वास्तव समाेर आले आहे. किराणा किट वाटपासाठी खरेदी ते थेट आदिवासींपर्यंत साहित्य पाेहचविण्यासाठी शासनाने निधीची तरतूद केली आहे. त्यानुसार राज्यभरात आदिवासींना किराणा पोहचविला जात आहे.
अमरावती तालुक्यातील शिराळा येथील पात्र आदिवासींना रेवसा येथील आश्रमशाळेतून किराणा किटचे वाटप करण्यात आले. मात्र, किराणा किटमधील सर्व साहित्य खाण्यायोग्य नाही, असा आरोप बिरसा क्रांती दलाचे अर्जुन युवनाते यांनी केला आहे. यादरम्यान आदिवासींनी अपर आयुक्त सुरेश वानखेडे, उपायुक्त नितीन तायडे, लेखापाल प्रवीण ईंगळे, अधीक्षक शिंदे यांच्याकडे व्यथा मांडल्या. यावेळी रोहित झाकर्डे, पवन सोळंके, सुमीत झाकर्डे, श्यामराव चव्हाण, मधुकर मालवीय, शंकर झाकर्डे, अमोल झाकर्डे, शिवकली पानसे, शिल्पा चव्हाण, शंकुतला वाळिवे, संगीता सोळंके आदींनी निकृष्ट किराणा आणून लक्ष वेधले.