बिबट्यांचा गावात शिरकाव; धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:13 AM2021-02-10T04:13:57+5:302021-02-10T04:13:57+5:30
पान ३ पोहरा बंदी : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील हातला बीटनजीकच्या वनखंड क्रमांक ३१३ परिसरातील ...
पान ३
पोहरा बंदी : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील हातला बीटनजीकच्या वनखंड क्रमांक ३१३ परिसरातील नया सावंगा येथील बाळकृष्ण भलावी (रा. नया सावंगा) यांची पाळीव गाय बिबट्याने जागीच फस्त केल्याची बाब मंगळवारी पहाटे उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिरोडी प्रभारी वर्तुळ अधिकारी राजन हिवराळे यांनी घटनास्थळ गाठून पशुमालकांशी संवाद साधून घटनास्थळी पंचनामा केला. गोठ्यात जाऊन पाहणी केली असता, बिबट्याने शिकार केल्याचे निदर्शनात आले. आठवड्यापूर्वी वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पोहरा वर्तुळातील पोहरा बीट परिसरातील वळूमाता प्रक्षेत्रात बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात शिरून गाईच्या कळपातून एक गाय ठार करून फरफटत नेल्याची घटना घडली होती. वनक्षेत्राला लागूनच पोहरा, नया सावंगा हे गाव आहे. अलीकडे बिबट्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे त्यांचा मनुष्य वस्तीत शिरकाव वाढला आहे.