जिल्ह्यात डेंग्यूसह इतर आजारांचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 05:00 AM2021-06-05T05:00:00+5:302021-06-05T05:00:27+5:30
सन २०१६ मध्ये डेंग्यूने कहर केला होता. सततच्या उपाययोजनांमुळे त्याचे प्रमाण घटत गेले. आजघडीला संशयित रुग्णांपैकी १५७ जणांचे रक्तजल नमुने तपासले असता, त्यापैकी सहा रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. चिककनगुनियाचे संशयित १५७ रुग्णांपैकी दोन पॉझिटिव्ह, तर मलेरियाच्या ९८७०७ संशयितांपैकी दोन पॉझिटिव्ह आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले.
इंदल चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात जानेवारी ते मे दरम्यान डेंग्यू आजाराचे सहा, चिकनगुनियाचे दोन आणि मलेरियाचे दोन रुग्ण आढळून आल्याचे जिल्हा हिवताप कार्यालयांतर्गत स्पष्ट करण्यात आले. १५७ नमुन्यांतून सहा पॉझिटिव्ह आल्याने टक्केवारी ३.८२ आल्याने कोरोनातून सवरत नाही तोच ऐन पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यूचा शहरात शिरकाव झाला आहे.
सन २०१६ मध्ये डेंग्यूने कहर केला होता. सततच्या उपाययोजनांमुळे त्याचे प्रमाण घटत गेले. आजघडीला संशयित रुग्णांपैकी १५७ जणांचे रक्तजल नमुने तपासले असता, त्यापैकी सहा रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. चिककनगुनियाचे संशयित १५७ रुग्णांपैकी दोन पॉझिटिव्ह, तर मलेरियाच्या ९८७०७ संशयितांपैकी दोन पॉझिटिव्ह आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले. ऐन पावसाळ्याच्या पर्वावर हा आजार उद्भवल्याने याचा फैलाव होण्यास वेळ लागणार नाही, या अनुषंगाने जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे १ जूनपासून शहरासह ग्रामीण भागात जनजागृती मोहीम व गप्पी मासे सोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे.
ग्रामीण भागात जनजागृती
पावसाळ्यात छतावर टाकाऊ वस्तू टायर, डबे, रबरी वस्तू पडलेल्या असतात. त्यात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने डासांच्या अळ्या तयार होतात. त्यापासून डासांची उत्पत्ती होत असल्याने अशा घरी भेट देऊन जनजागृती करण्यात येत आहे.
डबक्यांमध्ये गप्पी मासे
पावसाने ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचतात. त्यात डासांच्या अळ्या तयार होऊन डास उत्पत्ती होऊ नये, यासाठी अळ्या नष्ट करणाऱ्या गप्पी मासे डबक्यांमध्ये सोडण्याची मोहीम हिवताप कार्यालयामार्फत सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
१ जूनपासून ग्रामीण भागात साचलेल्या पाण्याच्या डबक्यांत गप्पी मासे सोडण्याची मोहीम आमच्या पथकाद्वारे राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. डासमुक्तीसाठी आम्ही कार्यरत आहोत.
- शरद जोगी, जिल्हा हिवताप अधिकारी