झेडपीतील पदभरती प्रक्रियेची माहिती मिळणार हेल्पलाईन क्रमांकावर
By जितेंद्र दखने | Published: April 17, 2023 04:12 PM2023-04-17T16:12:29+5:302023-04-17T16:13:04+5:30
प्रशासनाला सूचना : शंका निरसन करण्यासाठी उपाययोजना
अमरावती :जिल्हा परिषदांमधून होणाऱ्या पदभरती बाबत उमेदवारांना मिळणारी उडवाउडवीची उत्तरे लक्षात घेता. त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आता प्रत्येक जिल्हा परिषदांमधून पदभरती होईपर्यत हेल्पलाइन क्रमांक सुरू केले जाणार आहेत. या क्रमांकावर उमेदवारांनी भरती प्रक्रियेची विस्तुत माहिती मिळणार आहे.
दरम्यान शासनाने सरळसेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत दोन वर्षाची शिथिलता दिली आहे. तसेच जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची बिंदू नामावली अंतिम केली आहे. त्यानंतर आता आय.बी.पी.एस कंपनीद्वारे आपलिकेशन पोर्टल विकसित करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर राज्यात एकाच वेळी परीक्षा घेण्यासाठी सदर कंपनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतन,अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाडेतत्त्वावर देणारी शिफारस सचिव समितीने केली आहे. अशातच सध्या जिल्हा परिषदेतील पदभरतीच्या प्रक्रियेकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
विविध संवर्गातील पदांसाठी होणार भरती
राज्य स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा शासनाकडून ७५ हजार पदासाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी शासन स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्राम विकास विभागाचे अखत्यारित जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील तसेच आरोग्य व इतर विभागातील विविध संवर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला असून त्यामधून १८ हजार ९३९ पदे भरली जाणार आहेत.