राज्यात होणार तीन नवीन पोलीस आयुक्तालये, रणजित पाटील यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 06:48 PM2017-12-09T18:48:04+5:302017-12-09T18:48:11+5:30
लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.
अमरावती- लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड व ठाणे येथील मीरा भार्इंदर या ठिकाणी पोलीस आयुक्तालये स्थापन करण्याच्या प्रस्तावावर राज्य शासन विचाराधीन आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार गुन्हेगारीही वाढत आहे. यावर अंकुश ठेवणे आणि गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी मनुष्यबळ व कार्यालयीन क्षेत्र कमी पडत आहे. अशावेळी पोलीस यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. मात्र, मनुष्यबळाअभावी गुन्हेगारीवर अंकुश बसविणे कठीण जात आहे. या अनुषंगाने राज्यातील तीन ठिकाणी नवीन पोलीस आयुक्तालय देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. १५ ते २० वर्षांपासून हे प्रस्ताव प्रलंबित असून आता या प्रस्तावातील सर्व बाबींची पडताळणी सुरू आहे. राज्य शासन पुढील कार्यवाहीची दिशा ठरविणार आहे.
पोलीस वसाहतीसाठी ५०० कोटींचा निधी
राज्यातील पोलीस वसाहतीसाठी ५०० कोटींचा निधी प्राप्त झाला असून मुंबईसह अन्य काही ठिकाणच्या वसाहतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. २ लाख मनुष्यबळाच्या अनुषंगाने या वसाहतीचे बांधकाम केले जाणार असल्याची माहिती रणजित पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रात आणखी तीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना केली जाणार आहे. तेथील केसेस, लोकसंख्या आणि मनुष्यबळाची आवश्यकता यावर सर्व बाबी अवलंबून राहणार आहे.
- रणजित पाटील, गृहराज्यमंत्री