पोलिसांची अमानुष मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:17 PM2017-10-23T22:17:46+5:302017-10-23T22:18:09+5:30
नियम तोडून वाढदिवसाची पार्टी साजरी करणाºया काही जणांना गाडगेनगर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार रविवारी रात्री विद्यापीठासमोरील एका प्रतिष्ठानात घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नियम तोडून वाढदिवसाची पार्टी साजरी करणाºया काही जणांना गाडगेनगर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार रविवारी रात्री विद्यापीठासमोरील एका प्रतिष्ठानात घडला. या मारहाणीत राजू तिवारी, ज्योती तिवारी, राहुल तिवारी, सरताजसिंग अजितसिंग रिहाल, सुजितसिंग, अजितसिंग रिहाल, मनीष अहिरे, सरताज, अर्चना अहिरे, कोमल उके जखमी झाले. पीडितांनी सोमवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे घटनेची चौकशी सोपविण्यात आली आहे.
राजू तिवारी यांचा मुलगा राहुल याच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत डीजे वाजविण्यात आला. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाºया ध्वनीप्रदूषणाबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार गाडगेनगर ठाण्याचे चार्ली कमाण्डो शिपाई संदीप चव्हाण घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी रात्रीचे १० वाजून गेले होते. डीजे बंद करण्याच्या सूचना पोलिसांनी तिवारी यांना दिल्यात. डीजे सुरूच असल्याने पुन्हा तक्रार झाली.
पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. डीजे बंद करण्याच्या मुद्यावरून आयोजक आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली. मुद्दा तापू लागला. संतप्त पोलिसांनी वाद घालणाºयांवर तुफान लाठीमार केला. पार्टी उधळून लावली, असा आरोप बर्थ-डे पार्टीचे अयोजक तिवारी आणि मंडळींनी केला आहे. दरम्यान, राजू तिवारी, ज्योती तिवारी, सरताजसिंग अजितसिंग रिहाल, सुजितसिंग, अजितसिंग रिहाल व अन्य १० ते १५ जणांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी कायद्याचे पालन न करता ध्वनीप्रदूषण पसरवून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे.
जयस्तंभ चौकात निषेध
राजू तिवारी कुटुंबीयांनी पोलिसांच्या अमानुष मारहाणीसंदर्भात जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसून निषेध नोंदविला. यावेळी काही राजकीय पदाधिकाºयांनीही पोलिसांच्या या अमानुष अत्याचाराचा विरोध करून तिवारी कुटुंबीयांना समर्थन दिले. त्यानंतर तिवारी कुटुंबीय पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले होते.
महिलांशी धक्काबुक्की
वाढदिवसांच्या पार्टीत तिवारी कुटुंबातील महिलांची उपस्थिती होती. पोलिसांनी कार्यक्रम उधळून लावल्यानंतर तिवारी कुटुंबीयांनी विरोध केला. दरम्यान पोलिसांनी महिलांना ओढाताण करीत धक्काबुक्की केल्याचा आरोप तिवारी कुटुंबीयांनी केला आहे. यावेळी महिलांच्या अंगावरील दागिने तुटल्याने विखुरल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
पोलीस ‘अॅग्रेसिव्ह’ होण्याचे कारण काय ?
बर्थ-डे पार्टीदरम्यान पोलिसांसोबत नेमके काय घडले, ज्यामुळे ते अॅग्रेसिव्ह झाले. त्यांनी राजू तिवारीसह अन्य नागरिकांना अमानुष मारहाण केली, हे गुलदस्त्यात आहे. राजू तिवारी हा पोलीस रेकॉर्डवर आहे. त्याचा हद्दपारीचा आदेश निघाल्याचेही पोलीस सांगत आहे. मात्र, घटनेवेळी नेमके घडले काय, याचा शोध पोलीस घेत आहे.
दोषींना निलंबित करा
वाढदिवसाच्या दिवशी पार्टी उधळून अमानुष लाठीचार्ज करणाºया व महिलेवर हात उगारणाºया दोषी पोलिसांना निलंबित करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी (ओबीसी) मोर्चा विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केली आहे. पोलिसांच्या या अमानुष मारहाणीचा निषेध त्यांनी नोंदविला.
या घटनेचे नेमके कारण काय, दोषी कोण, याचा शोध घेण्यासाठी डीसीपींकडे चौकशी सोपविली आहे. चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल. माझी पोलीस यंत्रणा आक्रमक होण्यामागे वेगळे कारण असू शकते.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त