तिवस्यात अवैध सावकारांवर धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:35 PM2019-01-04T22:35:02+5:302019-01-04T22:35:41+5:30
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या अधिनस्थ पथकाने शुक्रवारी शहरातील चार सावकारांच्या सात ठिकाणांची झाडाझडती घेतली. त्यांच्या घर व प्रतिष्ठानातून डायरी, मुद्रांक, केसपेपर, बीसी रजिस्टर, इसार पावत्या आदी दस्तावेज जप्त करण्यात आला. जिल्हास्तरीय पथकाच्या आकस्मिक धाडीने तालुक्यातील अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या अधिनस्थ पथकाने शुक्रवारी शहरातील चार सावकारांच्या सात ठिकाणांची झाडाझडती घेतली. त्यांच्या घर व प्रतिष्ठानातून डायरी, मुद्रांक, केसपेपर, बीसी रजिस्टर, इसार पावत्या आदी दस्तावेज जप्त करण्यात आला. जिल्हास्तरीय पथकाच्या आकस्मिक धाडीने तालुक्यातील अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
‘तिवसा शहरात खासगी सावकारांच्या टोळ्या’ या २६ डिसेंबर रोजी प्रकाशित झालेल्या वृत्तातून ‘लोकमत’ने अवैध सावकारीचा मुद्दा प्रकाशात आणला. त्याची दखल घेत जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी सहायक निबंधक पथकप्रमुख असलेली सात पथके नेमली. या पथकांनी शुक्रवारी तिवसा शहरातील नितीन रामराव सुरटकर, विनोद भुजंग शिरभाते व मोहित दिलीप देशमुख यांच्या घर व दुकानावर तथा लकी नरेंद्र जिरापुरे यांच्या घराची अवैध सावकारीच्या अनुषंगाने झाडाझडती घेतली. चार सावकारांच्या सात ठिकाणांवर घालण्यात आलेल्या या धाडीदरम्यान निबंधक कार्यालयातील २४ कर्मचारी, सात पोलीस कर्मचारी तथा १४ पंच सहभागी झाले. सात स्वतंत्र पथकांनी सात ठिकाणची एकाच वेळी तपासणी केली. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ही कारवाई करण्यात आली. या धाडसत्रात तिवसा, अमरावती, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे येथील कर्मचारी सहभागी झाले होेते. अनिरुद्ध राऊत, सचिन पंतगे, राजेश भुयार, स्वाती गुडधे, डी.पी. राऊत, बी.एस. पारिसे, अशोक इंगोले या सात सहायक निबंधकांनी कारवाई पथकांचे नेतृत्व केले. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सावकारी विभागातील कर्मचारी सुधीर मानकर यांनी सहकार्य केले.
तपासणीदरम्यान कोरे धनादेश, कोरे मुद्रांक, डायरी, नोंदवह्या जप्त केल्या. शहरासह तिवसा तालुक्यात अलीकडे अवैध सावकारी बोकाळली आहे. तब्बल २० ते ३० टक्क््यांनी कर्ज देऊन प्रसंगी धाकदपटशा करून ते त्याची वसुली करतात. त्याअनुषंगाने शुक्रवारी धाडसत्र राबविण्यात आले.
निबंधकांना अधिकार
सावकारविरोधी कायद्यानुसार कुणालाही सावकारीचा व्यवसाय करायचा असेल, तर त्याला प्रथम तो ज्या क्षेत्रात व्यवसाय करणार आहे, तेथील ग्रामसभांची मान्यता घ्यावी लागते. या कायद्याच्या कलम १५ आणि १६ अन्वये महानिबंधक, जिल्हा निबंधक, सहायक निबंधक यांना दिवाणी न्यायाधीशांचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे चौकशी, छापा टाकण्याची मुभा तसेच मालमत्तेसंबंधातील व्यवहार रद्द करण्याचे न्यायाधीशांचे अधिकारही निबंधकांना देण्यात आले आहेत.
जबर शिक्षा
खोट्या नावाने परवाना, नमूद पत्त्याव्यतिरिक्त वा कार्यक्षेत्राबाहेर, दुसऱ्याच्या नावावर सावकारी करणे या बाबी आढळल्यास कलम ४१ अन्वये पहिल्यांदा गुन्हा केल्यास एक वर्षे कैद किंवा १५ हजार रुपयांपर्यंत दंड, दुसºयांदा किंवा त्यानंतर पाच वर्षे कैद आणि ५० हजारपर्यत दंड वा दोन्ही एकाच वेळी शिक्षा होते. कोरी वचनचिठ्ठी, बंधपत्र किंवा इतर प्रकारची कागदपत्रे घेतल्याचे निदर्शनास आल्यास तीन वर्षे कैद वा २५ हजार दंड किंवा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद कायद्यात केली आहे.
धाड टाकण्यात आलेल्या सावकारांची कागदपत्रे व काही धनादेश जप्त करण्यात आले आहेत. ते सीलबंद करण्यात आले. तपासणी करून यात अवैध सावकारी दिसून आल्यास, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे
- अनिरुद्ध राऊत, तालुका निबंधक, तिवसा