माहुलीतील अतिक्रमण काढण्यात गाववासीयांचा पुढाकार
By Admin | Published: August 30, 2015 12:01 AM2015-08-30T00:01:54+5:302015-08-30T00:01:54+5:30
माहुली (जहागीर) येथे झालेल्या उद्रेकानंतर प्रशासनाला जाग आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याच्या सूचना...
प्रशासनाला आली जाग : सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्या होत्या सूचना
अमरावती : माहुली (जहागीर) येथे झालेल्या उद्रेकानंतर प्रशासनाला जाग आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याच्या सूचना देताच नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे.
मंगळवार २५ आॅगस्ट रोजीची सकाळ साहिल डायरे या चिमुकल्यासाठी काळ बनून आली. त्यानंतर झालेल्या उद्रेकांनतर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केल्यामुळे माहुलीवासीयांवर मोठे संकट ओढवले. माहुलीतील अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. या कोंडीमुळे बसेस रस्त्यावर थांबवाव्या लागत होत्या. अशातूनच मंगळवारी मोर्शी-बुलडाणा एसटी रस्त्यावर उभी करून प्रवासी घेतले जात होते.
‘त्या’ वाहतूक पोलिसावर कारवाई का नाही?
माहुलीत वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र, ते घटनेच्यावेळी बसस्थानक परिसरात नव्हते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यावेळी वाहतूक पोलीस बसस्थानकजवळ असते तर बस मुख्य मार्गाच्या मधोमध उभी राहिली नसती. बस रस्त्याच्या मध्यभागी उभी करून चालक-वाहकाने प्रवासी आत घेतले. त्याचवेळी साहिलसुध्दा एसटीत चढत होता. तेथे वाहतूक पोलीस उपस्थित असते तर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या एसटीखाली साहिल चिरडला गेला नसता, अशा भावना माहुलीवासीयांनी व्यक्त केल्यात. त्यामुळे त्या बेजबाबदार वाहतूक पोलिसांवरही कारवाई करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.