जखमी काळवीटला गोरेवाड्यात हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:51 PM2018-07-18T23:51:30+5:302018-07-18T23:51:46+5:30
बडनेरा मार्गावरील काटआमलानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका नर काळवीटाला पुढील उपचारासाठी नागपूरच्या गोरेवाडा येथे हलविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा मार्गावरील काटआमलानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका नर काळवीटाला पुढील उपचारासाठी नागपूरच्या गोरेवाडा येथे हलविण्यात आले आहे.
बडनेरा रोडने जात असताना दोन काळवीट जखमी अवस्थेत रस्त्यावर दिनेश मालधुरे यांना आढळले. त्यांनी याची माहिती तत्त्काळ उत्तमसरा येथील वसा रेस्क्यू सेंटरला दिली. त्यानंतर वसाचे भूषण सायंके, निखिल फुटाणे व पंकज मालावे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वन्यप्रेंमीने काळवीटची पाहणी केली असता एक काळवीट दगावल्याचे निदर्शनास आले, तर दुसरे गंभीर जखमी झाले होते. त्यांनी वनविभागाच्या शिकार प्रतिबंधक पथकाला याबाबत अवगत केले. मात्र, ते दुसऱ्या रेस्क्यूवर काम करीत असल्यामुळे वेळेवर पोहचू शकले नाही. वसाच्या रेस्क्युअरनी बडनेरा पोलीस ठाण्याचे विनोद आमले यांच्या मदतीने दोन्ही काळवीटला ताब्यात घेतले.
काळवीटला बडनेरा पोलिसांच्या वाहनात टाकून वसा रेस्क्यू सेंटरवर आणण्यात आले. जखमी अवस्थेतील काळवीटवर शुभम सायंके आणि गणेश अकर्ते यांनी प्रथमोपचार केले. त्यानंतर शिवणी बिटमधील वनकर्मचाºयांनी पंचनामा केला. बडनेरा येथील पशुधन विकास अधिकारी इंगळे यांनी रेस्क्यू सेंटरवर येऊन जखमी काळवीटची पाहणी केली. मृत काळवीटचे शवविच्छेदन वनाधिकाºयांनी केले. जखमी काळवीटची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्याला तातडीने नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणावे, यासाठी वसाने वनविभागाला अर्ज केला. परिस्थिती लक्षात घेत उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी जखमी काळवीटला नागपूरला हलवण्याच्या दिशेने पाऊल उचलले. चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी कोकाटे यांनी वाहन उपलब्ध करून देताच वनरक्षक वीरेंन उज्जेनकर, वनरक्षक हिवराळे, वाहन चालक पंचभाई समवेत वसाचे भूषण सायंके व निखिल फुटाणे हे नागपूरकरिता रवाना झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अमरावतीचे मानद वन्यजीव सरंक्षक विशाल बनसोड यांनी गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये फोनद्वारे योग्य माहिती पोहचवून काळवीटच्या उपचाराकरिता योग्य मदत उपलब्ध करून दिली.