अन्यायग्रस्त आरोग्य सेविका रस्त्यावर
By admin | Published: September 20, 2016 12:18 AM2016-09-20T00:18:38+5:302016-09-20T00:18:38+5:30
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अख्यत्यारित येणाऱ्या मेळघाटात मागील आठ ते नऊ वर्षा पासून सेवा देणाऱ्या ..
जिल्हा परिषदेसमोर उपोषण : बदली आदेश देण्याची मागणी
अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अख्यत्यारित येणाऱ्या मेळघाटात मागील आठ ते नऊ वर्षा पासून सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकांना बदलीनंतर कार्यमुक्त करण्यात न आल्याने १९ सप्टेंबरपासून या अन्यायग्रस्त आरोग्य सेविकांनी झेडपी समोर उपोषण सुरू केले आहे.
मेळघाटातील २२ आरोग्य सेविकांची जिल्हा परिषद आरोग्य विभागाने २४ मे १५ रोजी रितसर मेळघाट क्षेत्राबाहेर बदल्या केल्या आहेत. यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ११ मे रोजी आरोग्य सेविकांचे समुपदेशनाव्दारे मेळघाट व दुर्गम भागातून बदल्या करून याबाबत आदेश पारित केले आहेत. मात्र या बदल्या करण्यात आलेल्या आरोग्य सेविकांना जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यमुक्त केले नाही. या प्रकाराला वर्षभराचा कालावधी लोटून गेल्यावरही निर्णय घेण्यात आला नाही. अशातच कार्यमुक्त करण्यासाठीचा आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने काढावा, याकरिता अनेकवेळा निवेदन व अधिकाऱ्यांना भेटूनही निर्णय न झाल्याने या अन्यायग्रस्त आरोग्य सेविकांनी जिल्हा परिषदे समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनात पद्मा जाधव, चंदा बेलसरे, पल्लवी इंगोले, ललिता मेश्राम, सुकेशनी करूणाधन, पुष्पा परांजपे, पुष्पा रामटेके, प्रिती तसरे, सुनीता मेश्राम, अश्र्विनी गुल्हाने,वर्षा वानखडे, संगिता शहाणे, ज्योती धर्माळे आदींचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)
प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे
आरोग्य सेविकांच्या बदली आदेश देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्याकडे सादर केला आहे. त्यानुसार हा प्रस्ताव मान्यतेसाठी सीईओंनी विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.