मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक भरतीत आदिवासींवर अन्याय; धाराशिव, सिंधुदुर्गमधील नवीन महाविद्यालयात एकही पद राखीव नाही

By गणेश वासनिक | Published: December 16, 2023 10:28 AM2023-12-16T10:28:34+5:302023-12-16T10:28:51+5:30

नव्याने स्थापन झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे सहायक प्राध्यापकांची ३४ पदे असून, सिंधुदुर्गमध्ये ३० पदे आहेत.

Injustice to tribals in recruitment of medical college professors; New College in Dharashiv, Sindhudurg has no vacancies | मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक भरतीत आदिवासींवर अन्याय; धाराशिव, सिंधुदुर्गमधील नवीन महाविद्यालयात एकही पद राखीव नाही

मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक भरतीत आदिवासींवर अन्याय; धाराशिव, सिंधुदुर्गमधील नवीन महाविद्यालयात एकही पद राखीव नाही

गणेश वासनिक

अमरावती : नव्याने स्थापन झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे सहायक प्राध्यापकांची ३४ पदे असून, सिंधुदुर्गमध्ये ३० पदे आहेत. यामध्ये साडेसात टक्के आरक्षण असलेल्या आदिवासी समाजाला एकही पद नाही. अलिबागमध्ये २९ पदे असून, यात आदिवासींना केवळ एक पद, साताऱ्यात ३१ पदे असून, इथेही एकच पद आहे. परभणीत २२ पदे असून, यात दोन पदे आदिवासींना आहेत.  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच  नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, धाराशिव, अलिबाग, सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी व सातारा येथील विविध विभागातील सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट- ब या संवर्गातील पदांच्या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. एमपीएससीमार्फत ५ डिसेंबर २०२३ रोजी तशी जाहिरात देण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक पदांच्या ५८० जागा असून, नव्याने स्थापन झालेल्या सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील १८५ पदे अशा एकूण ७६५ जागांचा समावेश आहे.   

एनटी, एसबीसी या प्रवर्गालाही फटका  

अनुसूचित जाती व जमाती यांचे सार्वजनिक सेवा योजनेचे आरक्षण हे भारतीय राज्यघटनेच्या कलम १५ (४), १६ (४) (४ क), कलम ३३५, कलम ३४२ व आरक्षण अधिनियम २००४ नुसार अबाधित आहे.

परंतु बिंदुनामावली चुकविल्यामुळे अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर गदा आली आहे. त्यामुळे विहित आरक्षणानुसार प्रतिनिधित्व मिळत नाही.

प्रत्येक संवर्गाला आरक्षण धोरणानुसार त्यांचा वाटा मिळाला पाहिजे, अशी मागणी ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद घोडाम यांनी केली आहे.

‘या’ विषयाची पदे

शल्यचिकित्साशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, शरीररचनाशास्त्र, विकृतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, बालरोग चिकित्साशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र, जीवरसायनशास्त्र, औषधशास्त्र, अस्थिव्यंगोपचार शास्त्र, कान, नाक व घसाशास्त्र, बधिरीकरण शास्त्र, औषध वैद्यकशास्त्र, नेत्रशल्यचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र .

Web Title: Injustice to tribals in recruitment of medical college professors; New College in Dharashiv, Sindhudurg has no vacancies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.