महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणांविरोधातील गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग
By प्रदीप भाकरे | Published: September 12, 2022 05:05 PM2022-09-12T17:05:31+5:302022-09-12T17:12:31+5:30
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी दुपारी राजापेठ अंडरब्रिज परिसरात शाईफेक करण्यात आली होती.
अमरावती : महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या फिर्यादीवरून आमदार रवी राणा व अन्य जणांविरूद्ध राजापेठ पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. अमरावती सीआयडीच्या उपअधीक्षक दिप्ती ब्राम्हणे यांनी त्याला दुजोरा दिला.
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी दुपारी राजापेठ अंडरब्रिज परिसरात शाईफेक करण्यात आली होती. त्याप्रकरणी आष्टीकर यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आमदार रवि राणा यांच्यासह कमलकिशोर मालाणी, महेश मूलचंदाणी, संदीप गुल्हाने, अजय बोबडे, अजय मोरय्या, विनोद येवतीकर व तीन महिला अशा ११ जणांवर भादंविचे कलम ३०७, ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, २०९, १२० (ब), ४२७, ५००, ५०१ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यात सात ते आठ जणांना अटक करण्यात आली. तर आ. राणा व तीन महिलांना अटकपूर्व जामीन मिळाला होता.
'त्या' प्रकरणी खासदार नवनीत राणांविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल
त्यानंतर आपण दिल्लीत असताना आपल्यावर कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल कसा होऊ शकतो, असा प्रश्न आ. रवि राणा यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर अनेक दिवस राणा दाम्पत्य व्हर्सेस पोलीस आयुक्त असे दवंद रंगले. दरम्यान, आ. रवी राणा हे घटनेच्या दिवशी दिल्लीत असताना त्यांच्याविरोधात दाखल गुन्हा हा एक छडयंत्राचा भाग असल्याने त्या गुन्हयाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात यावा, असे निवेदन खा. नवनीत राणा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्यावर गृहमंत्र्यांनी तो तपास सीआयडीकडे हस्तांतरित केला आहे.
केसडायरी, कागदपत्रे ताब्यात घेतली
राजापेठ पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या त्या गुन्ह्याची केसडायरी व संपुर्ण दस्तावेज ताब्यात घेतला आहे. शुक्रवारीच त्याबाबत राजापेठ पोलिसांना पत्र देण्यात आले होते. राजापेठ झोनच्या एसीपींकडून तो अनुषंगिक दस्तावेज तपासासाठी ताब्यात घेतल्याची माहिती अमरावती सीआयडीच्या उपअधीक्षक दिप्ती ब्राम्हणे यांनी सांगितले.