तर्जनीऐवजी मधल्या बोटाला शाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:06+5:302021-01-14T04:12:06+5:30

अमरावती : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नुकतीच झाली असल्याने मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला न मिटणारी शाई लावण्यात आली ...

Ink on the middle finger instead of the index finger | तर्जनीऐवजी मधल्या बोटाला शाई

तर्जनीऐवजी मधल्या बोटाला शाई

Next

अमरावती : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नुकतीच झाली असल्याने मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला न मिटणारी शाई लावण्यात आली होती. त्यामुळे ज्या मतदारांच्या बोटावरील शाई मिटली नसेल त्या मतदारांच्या मधल्या बोटाला शाई लावण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. दरम्यान, ५३७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पोलिंग पार्ट्या गुरुवारी रवाना होणार आहेत.

कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच गुरुवार १४ जानेवारीला मतदान केंद्र व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे व मतदान केंद्रावर क्रमांक टाकला असल्याची खात्री करावी व मतदान केंद्र मतदानासाठी तयार असल्याचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

या निवडणुकीसाठी १५ ला मतदान व १८ ला मतमोजणी होणार असल्याने मतमोजणीनंतर मतदानाची मेमरी उपकोषागार कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे १४, १५ व १८ जानेवारीला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यत तालुका मुख्यालयाचे उपकोषागार कार्यालय व अमरावती, भातकुली तालुक्याकरिता जिल्हा कोषागार कार्यालय सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी व सर्वांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील आठवडी बाजार १५ जानेवारीला भरत असल्यास ते बंद ठेवून अन्य सोयीच्या दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

बॉक्स

मतदान केंद्र असणाऱ्या शाळा १५ जानेवारीला बंद

जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ५३७ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ तारखेला होत आहे. सर्वच मतदान केंद्र हे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या खोल्यामध्ये आहेत व शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या आहे. त्यामुळे मतदान केंद्र असलेल्या शाळा १५ जानेवारीला बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

बॉक्स

या ठिकाणी मतमोजणी

अमरावती तालुक्याची शासकीय धान्य गोदाम विलासनगर, भातकुली - महापालिका शाळा, चपराशीपुरा, नांदगाव खंडेश्वर-कार्यशाळा, शासकीय आयटीआय, दर्यापूर, अंजनगाव, तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, चांदूर बाजार, वरुड तालुक्यात तहसील कार्यालय, अचलपूर- कल्याण मंगलम, मोर्शी - शिवाजी उच्च माध्यमिक शाळा, धारणी - आयटीआय व चिखलदरा तालुक्यात नगर परिषद गेस्ट हाऊसमध्ये मतमोजणी होणार आहे.

Web Title: Ink on the middle finger instead of the index finger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.