आमदार रवि राणांसह २५ शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:15 AM2021-09-22T04:15:20+5:302021-09-22T04:15:20+5:30
तिवसा न्यायालयाचा निकाल तिवसा : गतवर्षाच्या दिवाळीला बडनेरा विधानसभेचे आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वात गुरुकुंज मोझरी येथे अमरावती-नागपूर राष्ट्रीय ...
तिवसा न्यायालयाचा निकाल
तिवसा : गतवर्षाच्या दिवाळीला बडनेरा विधानसभेचे आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वात गुरुकुंज मोझरी येथे अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तिवसा पोलिसांनी आमदार रवि राणा, कार्यकर्ते व शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची तीन दिवस कारागृहात रवानगी केली होती. २१ सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी तिवसा न्यायालयात होती. न्यायाधीश कोरडे यांनी कलम ३४१, २६९, १८८, १४३, १३५ या विविध कलमातून आमदार रवि राणांसह कार्यकर्ते, शेतकरी यांची निर्दोष मुक्तता केली.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत व लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. जवळपास दोन तास आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन करीत, रस्त्यावर जाळपोळ करीत वाहने रोखून धरली होती. पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी रवि राणांसह शेतकऱ्यांना अटक केली होती. आठ महिन्यात तिवसा न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला. सर्व आंदोलनकर्त्यांची सुटका करीत निर्दोष मुक्तता केली. यावेळी आ. राणा यांच्यावतीने ॲड. आशिष लांडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयाने दिलेल्या निकालासंदर्भात आमदार राणा व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तर मुख्यमंत्र्यांची दिवाळी साजरी होऊ देणार नाही, असा इशारा आमदार राणा यांनी न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर दिला.