तत्कालीन कुलगुरूंची ‘आयकर’कडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:34 AM2018-08-24T01:34:37+5:302018-08-24T01:35:22+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांची आयकर विभागाने चौकशी आरंभली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या लेखा विभागाला ६ आॅगस्ट रोजी पत्र पाठविले.

Inquiries from the then Vice Chancellors 'Income Tax' | तत्कालीन कुलगुरूंची ‘आयकर’कडून चौकशी

तत्कालीन कुलगुरूंची ‘आयकर’कडून चौकशी

Next
ठळक मुद्देबंगल्याच्या सुुविधा भोवणार : मोहन खेडकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांची आयकर विभागाने चौकशी आरंभली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या लेखा विभागाला ६ आॅगस्ट रोजी पत्र पाठविले. कुलगुरू बंगल्याच्या सुविधांवर ‘आयकर’ने बोट ठेवल्याची माहिती आहे.
तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांचा २३ फेब्रुवारी २०११ ते २४ फेब्रुवारी २०१६ असा कार्यकाळ होता. त्यांच्या अनोख्या प्रतापामुळे संत गाडगेबाबांचे नाव असलेल्या अमरावती विद्यापीठाची पुरती लक्तरे वेशीवर टांगली गेली. मुलीचे गुणवाढ प्रकरण, बांधाबांध भत्ता, निकालात घोळ, विद्यार्थी संघटनांचे मोर्चे व आंदोलन यांचा सामना खेडकरांना करावा लागला होता. त्यांना कुलगुरुपदावरून मुक्त होऊन दीड वर्षांचा कालावधी झाला आहे. आता नव्याने आयकर बुडविल्याप्रकरणी आयकर विभागाने चौकशी आरंभली आहे. विद्यापीठ कायद्यानुसार, कुलगुरूंना निवासासाठी बंगला उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. मात्र, बंगल्यात वीज, पाणी, फर्निचर, नोकर-चाकर आदी सुविधा घेतल्या असतील, तर त्या खर्चावर आयकर भरणे नियमावली आहे. मात्र, खेडकरांनी आयकर बुडवून सर्व सुविधा घेण्याची किमया केली आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आयकरशी संबंधित फार्म क्रमांक १६ आणि फार्म क्रमांक १२ बीए भरलेला नाही. विद्यापीठाच्या लेखा व वित्त विभागाने २० आॅगस्ट रोजी माहिती पाठविली; परंतु, प्रकरण अतिशय गंभीर असल्याने अतिरिक्त माहितीसाठी विद्यापीठाने १० दिवसांचा अवधी घेतला आहे. खेडकरांनी दोन वर्षांचे ७.५ टक्के आयकरचा भरणा केला असला तरी पुढील तीन वर्षांचे आयकर बुडविण्याचे काम केल्याचेदेखील स्पष्ट होते.

बंगल्यावरील सुविधांमध्ये करचोरी
तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी बंगल्यावर नानाविध सुविधा घेण्यास कुचराई केली नाही. कुलगुरूंना ‘अनफर्निश्ड हाऊस’ देता येते. मात्र, बंगल्यात वीज, पाणी, फर्निचर, घरगुती कामासाठी नोकरचाकर दिमतीला असतील, तर त्यांच्यावर होणारा खर्च हा कुलगुरूंच्या वेतनातून आयकर कपात होऊन झाला पाहिजे, अशी नियमावली आहे. परंतु, खेडकरांनी या सर्व बाबीला फाटा देत चक्क करचोरी करण्याचा प्रताप केला आहे.

वित्त विभागाला नोटीस
तत्कालीन कुलगुरू खेडकर यांनी करचोरी केल्याप्रकरणी आयकर विभागाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाला पत्र देऊन २० आॅगस्ट रोजी माहिती पाठविण्याचे कळविले होते. मात्र, आयकरशी निगडित माहिती जुळविण्यात अवधी लागत असल्याने वित्त व लेखा विभागाने १० दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यामुळे खेडकरांना नव्या वादाला सामोरे जावे लागणार, असे दिसते आहे.

Web Title: Inquiries from the then Vice Chancellors 'Income Tax'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.