अमरावती विद्यापीठात नियमबाह्य अधिष्ठाता नियुक्तीप्रकरणी चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:10 AM2021-06-26T04:10:59+5:302021-06-26T04:10:59+5:30

एफ.सी. रघुवंशी यांच्या अडचणीत वाढ, उच्च शिक्षण सहसंचालकांना अहवाल पाठविण्याचे निर्देश अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एफ. सी. ...

Inquiry into the appointment of an illegal dean in Amravati University | अमरावती विद्यापीठात नियमबाह्य अधिष्ठाता नियुक्तीप्रकरणी चौकशी

अमरावती विद्यापीठात नियमबाह्य अधिष्ठाता नियुक्तीप्रकरणी चौकशी

Next

एफ.सी. रघुवंशी यांच्या अडचणीत वाढ, उच्च शिक्षण सहसंचालकांना अहवाल पाठविण्याचे निर्देश

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एफ. सी. रघुवंशी यांची नियमबाह्य अधिष्ठातापदी नियुक्ती झाल्याप्रकरणी शासनाने गंभीर दखल घेतली आहे. नियुक्तीसंदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल उच्च शिक्षण सहसंचालकांना पाठवावा लागणार आहे. प्राचार्य नीलेश गावंडे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने उच्च शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.

प्राचार्य गावंडे यांच्या तक्रारीनुसार, ७ मे २०२१ रोजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता एफ. सी. रघुवंशी यांच्या वेतनासंबंधी व त्यांच्या सेवेतील खंड क्षमापित करण्यासंबंधीची बाब व्यवस्थापन परिषदेसमोर विचाराधीन होती. या बैठकीत बाब क्रमांक ६० नुसार आलेल्या निर्णयाला त्यांनी विरोध विरोध दर्शविला. रघुवंशी यांच्या नियुक्तीच्यावेळी ते प्राचार्यपदी नव्हते. तत्कालीन उच्च शिक्षण सहसंचालक संजय जगताप यांनी रघुवंशीच्या नियुक्तीला आक्षेप घेतला होता आणि तशी नोंदसुद्धा केली. ही बाब महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याला छेद देणारी आहे. रघुवंशी हे प्राचार्य पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेऊन कायमस्वरूपी शासन व महाविद्यालयाच्या सेवेतून निवृत्त झालेले होते. त्यामुळे त्यांची डीन पदावरील नियुक्ती ही पुनर्नियुक्ती ही कायदेशीर दृष्ट्या सुसंगत आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात आली नाही.

---------

निवड समितीच्या अभिप्रायाला बगल

एफ. सी. रघुवंशी यांना रुजू करून घेण्यापूर्वी निवड समितीच्या शेऱ्यांची, अभिप्रायाची व शिफारसींची काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विद्यापीठाच्या नियोक्ता अधिकाऱ्यांची होती. मात्र, रघुवंशी यांच्याबाबत नियम गुंडाळण्यात आले, अशी तक्रार नीलेश गावंडे यांनी केली आहे. रघुवंशी यांना नियुक्तीपत्र देताना शासनाची पूर्वपरवानगी घेतलेली नाही.

-----------------

प्राचार्य नीलेश गावंडे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अधिष्ठाता एफ. सी. रघुवंशी यांच्या नियुक्तीबाबत कार्यवाही अहवाल उच्च शिक्षण सहसंचालकांना पाठवावा लागणार आहे. त्याअनुषंगाने संचालकांकडून तसे कळविण्यात आले आहे.

- तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

Web Title: Inquiry into the appointment of an illegal dean in Amravati University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.