कंत्राटी नियुक्तीप्रकरणी चौकशी पूर्ण, कारवाई केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:14 AM2021-04-01T04:14:12+5:302021-04-01T04:14:12+5:30
पंकज लायदे धारणी : शहरातील कोविड केअर सेंटरवर कंत्राटी नियुक्तीकरिता तेथीलच कर्मचारी गायगोले यांनी प्रत्येकी १२ हजार रुपये उकळले, ...
पंकज लायदे
धारणी : शहरातील कोविड केअर सेंटरवर कंत्राटी नियुक्तीकरिता तेथीलच कर्मचारी गायगोले यांनी प्रत्येकी १२ हजार रुपये उकळले, तर तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत पवार यांनी राबविलेली प्रक्रियासुद्धा संशयास्पद आढळून आल्याने त्यांचीसुद्धा मूकसंमती होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच या प्रकरणाची चौकशी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लावली. चौकशी होऊन १५ दिवस झाले तरी दोषींवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत नेमके पाणी कुठे मुरले, याकडे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा हे लक्ष देतील काय, अशी मागणी अन्यायग्रस्त आदिवासी युवकांकडून करण्यात आली आहे.
शहरातील कोविड केअर सेंटरवर कंत्राटी नियुक्तीकरिता आदिवासी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १२ हजार रुपये आरोग्य विभागातील कर्मचारी गायगोले याने उकळले, तर तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत पवार यांनी राबविलेली कागदोपत्री नियुक्ती प्रक्रिया ही संशयास्पद आढळून आल्याची माहिती आदिवासी कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली होती. त्याबाबत ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार धारणी तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत पवार, कर्मचारी गायगोले, तालुका विस्तार अधिकारी सपकाळ यांचे लेखी बयाण नोंदविले गेले. अन्यायग्रस्त आदिवासी कंत्राटी कर्मचाऱ्यांचेही बयाण नोंदविले. दिलीप रणमले यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्याकडे १५ दिवसांआधी अहवाल सादर केला. नेमके त्या चौकशी अहवालाचे काय झाले, जिल्हा परिषद प्रशासनाने दोषींवर कारवाई का केली नाही, याकडे अविशांत पांडा यांनी लक्ष देणे गरजेचे ठरले आहे.
-------
होळी झाली, पैसे परत मिळाले नाही
गायगोलेला पैसे देताना कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दागिने गहाण ठेवले तसेच उसनवार केली. ही रक्कम होळीआधी मिळावी, अशी त्यांची मागणी होती. होळी झाली तरी त्यांना पैसे परत मिळाले नाहीत.
बॉक्स
स्थायीच्या बैठकीत गाजला मुद्दा
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत धारणीतील कोविड केअर सेंटरवर नियुक्ती करीत कंत्राटी कर्मचार्यांकडून प्रत्येकी १२ हजार रुपये घेण्यात आले त्याची चौकशी झाली. मग कारवाई का करण्यात आली नाही, अशी मागणी मेळघाटातील जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंग गैलवार यांनी केली होती. त्यावेळी तत्कालीन सीईओ अमोल एडगे यांनी त्यांना कारवाईचा अहवाल आपणास देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. पण अद्यापाही काय कारवाईबाबत अहवाल त्यांना देण्यात आला नाही.
बाईट
चौकशी अहवाल प्राप्त झाला. तो अहवाल पुढील कार्यवाहीसाठी तत्कालीन सीईओ यांच्याकडे सादर करण्यात आला होता. परंतु त्यांची बदली झाल्याने नवनियुक्त सीईओ अविशांत पांडा यांच्याकडे पुढील कारवाईसाठी दिला आहे.
- दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी
जि प अमरावती
---------