चौकशी अहवाल ‘त्रोटक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:22 PM2018-07-17T23:22:33+5:302018-07-17T23:22:52+5:30
श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया कागदावर करण्यात आल्याचा निष्कर्ष काढणारा चौकशी प्रस्तावित करणारा अहवाल महापालिका प्रशासनाने ‘त्रोटक’ ठरविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया कागदावर करण्यात आल्याचा निष्कर्ष काढणारा चौकशी प्रस्तावित करणारा अहवाल महापालिका प्रशासनाने ‘त्रोटक’ ठरविला आहे.
स्वीकृत नगरसेवक प्रणय कुळकर्णी यांच्या प्रश्नादाखल दिलेल्या उत्तरात सामान्य प्रशासन विभागाने त्या चौकशी अहवालाला ‘त्रोटक’ ठरविल्याने प्रशासनाची भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याची भूमिका अधोरेखित झाली आहे. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांचा हा अभ्यासपूर्ण अहवाल प्रशासनाने महिनाभर दडविला होता, हे विशेष. महापालिका क्षेत्रातील नऊ हजार श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्याचा दावा पशुवैद्यकीय विभागाने केला. मात्र, शहरात भटक्या श्वानांची वाढती संख्या व त्यांच्या हैदोसाने तो दावा कुणाच्याही पचनी पडला नाही. शहरातील भटके श्वान मानवी देहाचे लचके तोडत असताना त्यांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा केल्याने त्या अनियमिततेची चौकशी आरंभण्यात आली.
श्वान निर्र्बीजीकरणाचा अहवाल प्रशासनाला मागितला. त्यांनी तो दिला. मात्र, तत्कालीन आयुक्तांनी तो त्रोटक ठरविल्याचे लेखी उत्तर मला मिळाले. यासंदर्भात आमसभेत प्रस्ताव टाकला जाईल. चर्चेवेळी प्रशासनाला जाब विचारू.
- प्रणय कुळकर्णी, स्वीकृत नगरसेवक
तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांनी शेटे यांचा अहवाल त्रोटक ठरविला. श्वान निर्बीजीकरणाच्या मूळ फाइलवर तशी नोंद आहे. त्या नोंदीनुसारच प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तत्कालीन आयुक्तांनी या प्रकरणी पुनर्चौकशीचे आदेश दिले आहेत.
- राहुल ओगले
सहायक आयुक्त